भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा पिंपरी महापालिकेत राडा, बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: October 18, 2023 19:58 IST2023-10-18T19:57:01+5:302023-10-18T19:58:21+5:30
सीसीटीव्हीत घटना कैद.

भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा पिंपरी महापालिकेत राडा, बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
पिंपरी : महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीने एका बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी बुधवारी (दि.१८) मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही कैद झाला आहे. महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे भाजप आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आहेत.
नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेलांची बोऱ्हाडेवाडीत जमीन आहे. सर्व्हे नंबर ६४४ मध्ये दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून डीपी मार्ग जातो, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरु आहेत. त्याची सुनावणी आज महापालिकेत होती. त्या सुनावणीनंतर नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेलांमध्ये वाद झाले. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी बोऱ्हाडे यांना रोखले आणि प्रकरण तिथेच निवळले. पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा पिंपरी महापालिकेत राडा, बिल्डरला सर्वांदेखत लाथा-बुक्क्यांनी मारहाण pic.twitter.com/szaV59K0mj
— Lokmat (@lokmat) October 18, 2023
'तुम्ही न्यायालयात जा अथवा कुठे ही जा, मला फरक पडत नाही', असे नरेश पटेल माझ्या चुलत्याला बोलले. हे अशोभनीय होते, त्याच रागात हे घडले, असे मारहाणीनंतर नितीन बोऱ्हाडे यांनी स्पष्टीकरण दिले. तर मी असे काहीच बोललो नाही, उलट डीपीनुसार मार्ग होऊ द्या. त्यानुसार झाल्यास मलाच फायदा होणार होता. त्यामुळे बोऱ्हाडे यांनीच न्यायालयात जाण्याची भाषा वापरल्याचा दावा नरेश पटेलांनी केला. तसेच बिल्डर नरेश पटेलांनी तक्रार करणार नसल्याचे लोकमतशी बोलतांना सांगितले.