‘माजी’ की ‘माननीय’, ठरवा तुम्हीच!

By admin | Published: December 8, 2015 12:04 AM2015-12-08T00:04:46+5:302015-12-08T00:04:46+5:30

एकदा का नावापुढे पद लागले की, पदाचा कालावधी संपल्यानंतरही पदाशिवाय समाजात मिरविणे अवघड होते. अशीच स्थिती सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे

'Former' or 'honorable', you decide! | ‘माजी’ की ‘माननीय’, ठरवा तुम्हीच!

‘माजी’ की ‘माननीय’, ठरवा तुम्हीच!

Next

मंगेश पांडे, पिंपरी
एकदा का नावापुढे पद लागले की, पदाचा कालावधी संपल्यानंतरही पदाशिवाय समाजात मिरविणे अवघड होते. अशीच स्थिती सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. माजी होऊन काहींना दोन वर्षे, तर काहींना तब्बल २५ वर्षे उलटली, तरीही अद्याप नावाअगोदर केवळ ‘मा’ असल्याचे फलक नजरेस पडत आहेत. त्यामुळे ‘मा’ म्हणजे माजी आहेत की ‘माननीय’ आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे.
निवडणुकीत निवडून येण्यासाठी आटापिटा केला जातो. निवडून आल्यानंतर पाच वर्षे पद भोगले जाते. यामुळे पदाची एकप्रकारे सवयच लागलेली असते. मानपान, कार्यकर्त्यांचा गराडा, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश सोडणे यांमुळे पाच वर्षे उलटल्यानंतरही पदापासून दूर जावेसे वाटत नाही.
राजकीय पदाचा कालावधी संपल्याने सभागृहात बसता येत नाही. शिवाय अधिकार गेले असले, तरीही किमान आपल्या नावात तरी पद असावे, अशी भाबडी अपेक्षा असते. त्यामुळेच माजी झाले, तरी केवळ ‘मा’ असाच उल्लेख केला जातो.
रस्त्यावर ठिकठिकाणी, तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर मोठमोठे फलक उभारलेले असतात. ‘मा. ........’ यांच्या निवासस्थानकाकडे, असा उल्लेख केला जातो. संबंधितांच्या नावाअगोदर लावण्यात येणारे ‘माननीय’ आहे की ‘माजी’ हे ज्याला समजेल, त्याने समजून घ्यायचे, अशी स्थिती आहे. हे चित्र पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र दिसत आहे. शहरात महापालिका असल्याने महापौर, उपमहापौर, नगरसेवक, स्वीकृत सदस्य असे पदाधिकारी आहेत. गत पंचवार्षिकला १०५, तर या पंचवार्षिकला १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, अद्यापही गत पंचवार्षिकच्या ढीगभर ‘माजीं’नी फलक हटविलेले नाहीत. शिवाय, जे फलक आहेत, त्यावरील नावापुढेही ‘मा’ असाच उल्लेख पाहायला मिळत आहे. यासह शहराच्या हद्दीत दोन खासदार आणि तीन आमदार आहेत. यातील मागील पंचवार्षिकला असलेले एक खासदार पुन्हा निवडून आले आहेत, तर दुसरे खासदार पराभूत झाले. मात्र, हे खासदार माजी असा उल्लेख न करता ‘प्रथम खासदार’ असा उल्लेख करतात. यासह निवासस्थानाजवळील फलकावरही माजीऐवजी ‘मा’ असा उल्लेख केलेला आहे.
तर, गेल्या पंचवार्षिकमधील तीन आमदारांपैकी दोन पराभूत झाले, तर एक पुन्हा निवडून आले. ‘माजी’ यांच्या नावाअगोदर अजूनही ‘मा. आमदार’ असेच झळकत आहे. यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद अद्यापपर्यंत २३ जणांनी भूषविले. यापैकी पाच माजी महापौरांचे निधन झाले आहे, तर सध्याच्या १७ माजी महापौरांपैकी ९० टक्के ‘माजीं’च्या निवासस्थानासमोर उभारण्यात आलेल्या फलकांवरील नावासमोर ‘मा’ असाच उल्लेख आहे.
कुठे रस्त्यावर, तर कुठे पदपथावर, असे फलक उभारलेले असतात. यासाठी महापालिकेची परवानगी आहे की नाही, याकडेही लक्ष दिले जात नाही. दुर्दैव म्हणजे याबाबत कोणाकडून तक्रारही केली जात नाही.

Web Title: 'Former' or 'honorable', you decide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.