माजी सैनिक,विधवा पत्नींना संपूर्ण मिळकतकर माफ होणार; पिंपरी महापालिकेची कार्यवाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:59 PM2020-09-16T13:59:53+5:302020-09-16T14:03:58+5:30
राज्य शासनाच्या नव्या आदेशामुळे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मिळकतीवरील शंभर टक्के मिळकतकर माफ केला जाणार आहे..
पिंपरी : राज्य शासनाने माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना संपूर्ण मिळकतकर माफी योजना दिनांक ९ सप्टेंबरपासून लागू केली आहे. राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही कार्यवाही सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीना महापालिकेच्या वतीने मिळकतकरातील सामान्यकरात पन्नास टक्के सूट दिली जात आहे. आता राज्य शासनाच्या नव्या आदेशामुळे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मिळकतीवरील शंभर टक्के मिळकतकर माफ केला जाणार आहे, तसे आदेश राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज संस्थांना ९ सप्टेंबरला दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत ही योजना लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, माजी सैनिक व त्यांच्या विधवांना संपूर्ण मिळकतकर माफीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
............
‘‘माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मिळकत करमाफीच्या योजनेसंदर्भात राज्य शासनाचा आदेश पालिकेस प्राप्त झाला आहे. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मंजुरी घेऊन तो लागू केला जाईल. तो कधीपासून लागू करायचा. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांमध्ये ज्यांनी मिळकतकर भरला आहे, त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे, चर्चा करून ठरविण्यात येणार आहे.
-स्मिता झगडे, सहायक आयुक्त, मिळकत कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका