‘नार्कोटिक्स’मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक; पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलकडून कारवाई

By नारायण बडगुजर | Published: August 6, 2024 05:55 PM2024-08-06T17:55:09+5:302024-08-06T17:56:17+5:30

तुमच्या नावाने जात असलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून महिलेची २४ लाखांची फसवणूक केली

Four arrested for deceiving by claiming to be speaking from Narcotics Action by Cyber Cell of Pimpri-Chinchwad | ‘नार्कोटिक्स’मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक; पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलकडून कारवाई

‘नार्कोटिक्स’मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक; पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलकडून कारवाई

पिंपरी : मुंबई येथून इराण येथे तुमच्या नावाने पार्सल जात असून त्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, असे सांगून महिलेची २४ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार संशयिताना पिंपरी-चिंचवड सायबर सेलने अहमदनगर, जळगाव आणि सुरत येथून अटक केली.

स्वरूप अशोक खांबेकर (४२, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), पुष्कर चंद्रकांत पाखले (रा. चखाळीसगाव, जि. जळगाव), मोनीक भरतभाई रंगोलीया, कौसिक मन्सुखभाई बोरड (दोघे रा. सुरत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाणेर येथील ३८ वर्षीय महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाइल क्रमांकधारकाने फिर्यादी महिलेला फोन केला. तो फेडेक्स कुरीअर कंपनी, मुंबई अंधेरी येथून बोलत असल्याचे भासवले. तुमचे मुंबई ते इराण असे कुरिअर जात आहे. त्या औषधाच्या कुरिअरमध्ये एका औषधामध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत तुमचा कॉल नार्कोटिक्स विभागाला ट्रान्सफर करतो, असे म्हणत संशयिताने कॉल दुसऱ्या संशयिताला जोडला. त्यानंतर दुसऱ्या संशयिताने ते पार्सल कस्टमवाल्यांनी अटकवून ठेवल्याचे सांगितले. तुम्हाला मुंबई येथे येऊन ते तुमचे पार्सल नाही हे क्लियर करावे लागेल किंवा ऑनलाइन स्काइप ॲपवरून बोलून क्लियर करावे लागेल, असे सांगितले.
 
स्काइप ॲपच्या माध्यमातून संशयितांनी फिर्यादी महिलेच्या मोबाइलच्या स्क्रिनचा ॲक्सेस मिळवला. महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून २४ लाख ९९ हजार ९९८ रुपये बँक खात्यावर घेतले. याबाबत हिंजवडी पोलिस तपास करीत होते. याच गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी - चिंचवड सायबर सेलकडून सुरू होता.

सायबर पोलिसांनी संशयितांच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्याद्वारे संशयितांची ओळख पटवून त्याला अहमदनगर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करत त्याच्या इतर तीन साथीदारांची माहिती घेऊन त्यांनाही जळगाव आणि सुरत येथून ताब्यात घेतले. संशयितांनी वापरलेल्या बँकेच्या खात्यावर दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. त्या खात्याबाबत भारतातून ६८ तक्रारी आलेल्या आहेत.

सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल देवडे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Four arrested for deceiving by claiming to be speaking from Narcotics Action by Cyber Cell of Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.