खूनप्रकरणी चौघांना अटक
By admin | Published: July 15, 2017 01:35 AM2017-07-15T01:35:45+5:302017-07-15T01:35:45+5:30
जिरेगाव परिसरातील वनविभागामध्ये अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणी चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : जिरेगाव परिसरातील वनविभागामध्ये अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणी चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, हा खून एका महिलेवर वाईट नजर ठेवल्याच्या संशयावरून झाला. आरोपी संदीप देठे याला आपल्या पत्नीवर मृत शिवशंकर याचा डोळा असल्याचा संशय होता.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संदीप नारायण देठे (वय ३२, रा. कुसखुर्द, ता. जि. सातारा), संतोष विष्णू शिरटावले (वय २१, मूळ रा. खडगाव , ता. जि. सातारा, सध्या रा. विरार (मुंबई), श्रीकांत आबा शिरटावले (वय २६, रा. खडगाव, ता. जि. सातारा, सध्या रा. कांदिवली ईस्ट मुंबई), ऋषभ ऊर्फ सोनू लक्ष्मण यादव (वय २१, रा. बनगर, ता. जि. सातारा, सध्या रा. खेतवाडी, मुंबई) यांना अटक केली.
६ जून रोजी जिरेगावच्या वनविभागात एक अज्ञात व्यक्तीचा खून झाला होता. याप्रकरणी दौंड आणि कुरकुंभ पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केल्यानंतर तपासाची चक्रे साताऱ्याकडे फिरली. यामधील मृत शिवशंकर ऊर्फ शिबू (मूळ रा. कोलकता) व मुख्य आरोपी संदीप देठे या दोघांची पूर्वीच ओळख होती. त्यामुळे संदीप आणि मृत शिवशंकर सातारा येथे काही काळ संदीप यांच्या गोठ्यामध्ये कामाला होता. त्यानंतर मृत शिवशंकर आणि संदीप यांच्यामध्ये वैयक्तिक वादामुळे शिवशंकर कुरकुंभ येथे पेंटिंगचे कामे करू लागला. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून संदीप देठे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात होता. संदीपला त्याचा मित्र ऋषभ याने माहिती दिली. यावर संदीपला राग आला आणि त्याने शिवशंकरचा खून करण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्याने ऋषभला शिवशंकरला दारू पाजण्यास सांगितले व अन्य मित्रांसोबत तो कुरकुंभ परिसरात आला. त्यानंतर वरील आरोपीनी शिवशंकरचा गळा चिरून खून केला व जिरेगावच्या वनविभागात त्याचा मृतदेह लपविला. वरील चारही आरोपींना बुधवारपर्यंत (दि. १९) पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.
असा लागला
खुनाचा तपास
खून झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर तपास न लागल्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी फ्लेक्स, पॉम्पलेट कुरकुंभसह अन्य लावले, तसेच कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार पुरविणाऱ्या विविध ठेकेदारांची, कंपनी व्यवस्थापकांची बैठक घेतली.
या बैठकीनंतर दाखविण्यात आलेल्या छायाचित्रावरून मृताची ओळख पटली. त्यानुसार पोलीस तपास करीत असताना सोशल मीडियाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
तद्नंतर आरोपीच्या मोबाईलवर खून करण्यापूर्वी मृत शिवशंकरसोबत आरोपी ऋषभ याचा सेल्फी मिळून आल्यामुळे तपासाला गती मिळाली व अखेर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींना ताब्यात घेतले.