पिंपरीत चार नगरसेवकांचे पद धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 01:06 AM2018-09-12T01:06:01+5:302018-09-12T01:06:22+5:30

महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेवकांना सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली होती.

Four corporators in danger in danger? | पिंपरीत चार नगरसेवकांचे पद धोक्यात?

पिंपरीत चार नगरसेवकांचे पद धोक्यात?

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेवकांना सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार नगरसेवकांनी मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे भाजपाच्या संबंधित चार नगरसेवकांच्या माहितीचा अहवाल महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे नुकताच पाठविला आहे. त्यामुळे चार नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार कायम आहे.
पुणे महापालिकेत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सात नगरसेवकांनी सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे संबंंधितांचे पद रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिकांतील विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांची माहिती नगरविकास खात्याने मागविली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये २२ आॅगस्ट २०१७ पर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत होती. भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड, यशोदा बोईनवाड, मनीषा पवार व कमल घोलप यांनी मुदतीनंतर प्रमाणपत्र सादर केले आहे. संबंधित चार नगरसेवकांनी जात प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसल्याचा अहवाल नगरविकास विभागाकडे अंतिम निर्णयासाठी पाठविला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली.
चिखली प्रभाग क्रमांक एक ‘अ’ या राखीव जागेवरून भाजपाचे उमेदवार कुंदन गायकवाड निवडून आले आहेत. तर, भोसरी धावडेवस्ती, भगतवस्ती प्रभाग क्रमांक सहा एक-अ या राखीव जागेवर निवडून आलेल्या नगरसेविका यशोदा बोईनवाड यांनी दीड वर्ष होत आले तरी जात प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

Web Title: Four corporators in danger in danger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.