दहा मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 03:11 AM2019-03-02T03:11:26+5:302019-03-02T03:11:29+5:30
भक्तिशक्ती ते पिंपरी चौकादरम्यान कोंडी : वेळेचा अपव्यय आणि इंधन खर्च होत असल्याने वाहनचालक त्रस्त
- शीतल मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : निगडी ते पिंपरी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. काही ठिकाणी बीआरटी मार्ग देखील बंद आहेत. भक्ती-शक्ती चौकात देखील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे निगडी ते पिंपरी दहा मिनिटांचा प्रवास पाऊणतासाचा झाला आहे. वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पिंपरी आणि मोरवाडी चौकात वाहनचालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
पिंपरी चौक, मोरवाडी चौक ते चिंचवड स्टेशनपर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. निगडीतील लोकमान्य टिळक चौकात उड्डालपुलाखाली रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. तेथे पीएमपी बस भर रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे रस्ता अरूंद होतो. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. तिथून पुढे असलेल्या सिग्नलवर किमान पाच मिनिटे वाहने थांबतात. चिंचवड स्टेशन येथील दोन सिग्नलवरही हिच परिस्थिती आहे. चिंचवड स्टेशनकडून मोरवाडीला जाणारा रस्ता मेट्रोच्या कामामुळे अरूंद झाला आहे. मोरवाडी चौकातील सिग्नल बंद आहे. तरीही वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत आहे.
१निगडी ते पिंपरी हे अंतर वाहनाने पार करण्यासाठी साधारणपणे १० मिनिटे लागायला हवीत. मात्र महामार्गाने निगडी येथून पिंपरीत पोहचण्यासाठी तब्बल सव्वा तासाचा वेळ लागत आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी (दि. १) सायंकाळी सहाला निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून दुचाकीवरून प्रवासाला सुरुवात केली. निगडी येथील टिळक चौकाच्या अलीकडे खासगी ट्रॅव्हल्स बस रस्त्यावरच उभ्या होत्या. एकाच वेळी चार ते पाच बस रस्त्यावरच उभ्या करण्यात आल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे या चौकातून दुचाकी चालवणेही जिकिरीचे झाले होते. चौकात पीएमपी बसथांबा आहे. या बसथांब्यालगत बेशिस्त रिक्षाचालकांनी रस्त्यातच रिक्षा उभ्या केल्या होत्या. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत होती. त्यातून मार्ग काढत चौकात मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखालील सिग्नलपर्यंत पोहचण्यासाठी १० मिनिटांचा अवधी गेला.
२भक्तिशक्ती चौक ते टिळक चौकात पोहोचेपर्यंत ६ वाजून १० मिनिटे झाली होती. तेथून हातगाडीवाल्यांचा सामना करीत आकु र्डी चौकात पोहोचेपर्यंत ६ वाजून २५ मिनिटे झाली होती. त्यानंतर आकुर्डी चौकातून जयश्री टॉकीजसमोर पोहोचेपर्यंत ६ वाजून ३० मिनिटे झाली होती. चिंचवड स्टेशन चौकात एकापाठोपाठ दोन सिग्नल येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. चिंचवड स्टेशन येथून मोरवाडी चौकात पोहोचण्यासाठीही अशीच कसरत करावी लागली. मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मोरवाडी चौकातील सिग्नल सध्या बंद आहेत. मात्र मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झालेला असल्यामुळे वाहतूककोंडी होते. तसेच कोणत्या दिशेने कोणते वाहन येत आहे, याबाबत अंदाज घेता आला नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता असल्याचे समोर आले.
३मोरवाडी चौकात पोहोचेपर्यंत ६ वाजून ४० मिनिटे झाली होती. महापालिका भवनासमोरील रस्ताही मेट्रोच्या कामामुळे अरुंद झाला आहे. त्यामुळे येथेही वाहनांचा खोळंबा होतो. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूककोंडी कमी झालेली आहे. मोरवाडी चौकातून पिंपरी चौकात पोहोचेपर्यंत ६ वाजून ४५ मिनिटे झाली होती. त्यामुळे सायंकाळी गर्दीच्या वेळेत भक्तीशक्ती चौक ते पिंपरी चौका दरम्यानच्या प्रवासासाठी तब्बल पाऊण तासाचा कालवधी जात असल्याचे निदर्शनास आले. दररोजच्या या त्रासामुळे या मार्गावरील प्रवास कंटाळवाणा झाला आहे. प्रवासात नाहक वेळ जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.