मोशीत जमिनीच्या सपाटीकरणासह पावणे चार किलोमीटरची सीमाभिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:17 PM2018-12-19T23:17:30+5:302018-12-19T23:17:55+5:30
नवनगर विकास प्राधिकरण : आंतरराष्ट्रीय खुले औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे पहिल्या टप्प्यातील काम
मंगेश पांडे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून मोशीत अद्ययावत आंतरराष्ट्रीय खुले औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १० हेक्टर क्षेत्राच्या जमिनीचे सपाटीकरण केले असून, येथे अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी तब्बल पावणेचार किलोमीटर लांबीची सीमाभिंत उभारण्यात आली आहे.
मोशी प्राधिकरणातील सेक्टर ५ व ८ येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. या केंद्राच्या पहिल्या टप्प्यात जमिनीचे सपाटीकरण, वृक्षारोपण, सीमाभिंत उभारणी आदी कामे केली जात आहेत. सुरुवातीला केंद्र उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या कामांवर भर दिला जाणार आहे. या अंतर्गतच १० हेक्टर क्षेत्राच्या जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. यासह सुरक्षिततेसाठी सीमाभिंत उभारण्यात आली आहे. यासह स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे.
प्राधिकरण अथवा महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणे होण्याची भीती असते. अतिक्रमण झाल्यास ती हटविताना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान, प्राधिकरणाचे मोशी परिसरात अनेक मोकळे भूखंड आहेत. मोशी येथे साकारत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठीच्या मोकळ्या जागेवरही अनेक ठिकाणी मोठी वाहने उभी केली जायची. यासह या जमिनींवर छोटी हॉटेल, फळांची दुकाने आदी अतिक्रमणे होण्याची भीती असते. ऐनवेळी ही अतिक्रमणे हटविताना कसरत करावी लागते. त्यामुळे प्राधिकरणाने तब्बल पावणेचार किलोमीटर लांबीची सिमेंट काँक्रीटची सीमाभिंत उभारली आहे. यामुळे आता ही जागा अतिक्रमणांपासून सुरक्षित झाली असून, इतर अंतर्गत कामांनाही सुरुवात झाली आहे.
मोशीतील सेक्टर ५, ८ येथे खुले औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. येथील दहा हेक्टर क्षेत्राच्या जमिनीचे सपाटीकरणाचे तसेच पावणेचार किलोमीटर लांबीच्या सीमाभिंतीचे काम पूर्ण झाले आहे.
- अलकनंदा माने,
अधीक्षक अभियंता.