Pimpri Chinchwad Fire: चिखलीत पोटमाळ्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा जळून मृत्यू
By नारायण बडगुजर | Published: August 30, 2023 03:04 PM2023-08-30T15:04:54+5:302023-08-30T15:05:41+5:30
चिखली पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली...
पिंपरी : हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. दुकानाच्या पोटमाळ्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा यात मृत्यू झाला. अग्निशामक दल तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुकानतून मृतदेह बाहेर काढले. पूर्णानगर, चिखली येथे बुधवारी (दि. ३०) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाहीत. चिखली पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
चिमनाराम वनाजी चौधरी (वय ४८), नम्रता चिमनाराम चौधरी (वय ४४), चिकू उर्फ सचिन चिमनाराम चौधरी (वय १०), भावेश चिमनाराम चौधरी (वय १३) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरातील पूर्णानगर येथील पूजा हाईटस या हाउसिंग सोसायटीत बीआरटी मार्गाच्या सेवारस्त्याला लागून दुकाने आहेत. त्यात चिमणाराम चौधरी यांचे सचिन हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रिकल्स नावाचे एक दुकान आहे. या दुकानाच्या पोटमाळ्यावर चौधरी कुटुंब वास्तव्यास होते. मंगळवारी रात्री चौधरी कुटुंब दुकान बंद करून पोटमाळ्यावर झोपले. दरम्यान बुधवारी पहाटेच्या सुमारास दुकानात आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे दुकानात मोठा धूर झाला. गुदमरू लागल्याने चिमणाराम चौधरी आणि त्यांची पत्नी व मुलांना जाग आली. त्यांनी दुकानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, धुर व आगीमुळे होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, दुकानाच्या पोटमाळ्यावरील खिडकीच्या ग्रीलमधून आगीचे लोळ व धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे दुकानात आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी अग्निशामक दल व पोलिसांना माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाला पहाटे ५:२५ वाजता काॅल झाला. त्यानंतर ५:२८ वाजता अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तसेच पोलिसही दाखल झाले.
दुकानाला समोरून दोन व बाजूने एक असे तीन शटर होते. तीनही शटर आगीमुळे तप्तलाल झाले होते. कुलूप असल्याने शटर उघडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे दुकानाच्या समोरच्या बाजूच्या शटरला दोर बांधून अग्निशामक दलाच्या गाडीने ओढून शटर तोडले. या शटरला लागून दुकानात काउंटर होते. अग्निशामकच्या जवानांनी काउंटर कापून बाजूला काढले. त्याचवेळी दुकानाच्या दुसऱ्या बाजूचे शटर देखील तोडले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मृतदेह बाहेर काढून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले.