लसीकरणाचा चार लाखांचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:37 AM2019-01-08T00:37:46+5:302019-01-08T00:38:00+5:30
विशेष मोहीम : गोवर-रुबेलाच्या सुमारे ६ लाख १६ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट
पिंपरी : राज्य शासनाची गोवर-रुबेला लसीकरण मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे राबविण्यात येत आहे. यासाठी शहरात १२०० ठिकाणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत सहा लाख १६ हजार १९३ एवढे उद्दिष्ट आहे. यापैकी चार लाख ३४ हजार २३४ एवढे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबर २०१८ पासून राबविण्यात येत आहे. गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत लाभार्थी म्हणून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालके व विद्यार्थी येतात. या वयोगटातील जास्तीत जास्त बालक व विद्यार्थ्यांपर्यंत सर्व महापालिका व खासगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, प्ले ग्रुपमार्फत मोहिमेपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मनपा व खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. राज्य शासनाच्या मोहिमेत महापालिकेस लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे विविध विभाग, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, रोटरी क्लब, लायन्स क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, पिंपरी-चिंचवड डॉक्टर असोसिएशन, खासगी बालरोगतज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषद, एकात्मिक बालविकास प्रकल्प, अंगणवाडीसेविका आदींचे सहकार्य मिळत आहे. तसेच सार्वजनिक आरोग्यामध्ये गोवर लसीकरण हे एक प्रभावी साधन ठरले आहे. या मोहिमेत ज्या बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण राहिलेले आहे, त्यांनी महापालिकेची रुग्णालये अथवा बाह्यसंपर्क सत्रांच्या ठिकाणी लसीकरण करून घ्यावे व मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
पालकांना महापालिकेचे आवाहन
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोवर-रुबेला लसीकरणासाठी विशेष बूथ स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच, महापालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी, बालवाडी, बांधकामे, वीटभट्ट्या आदी ठिकाणी बाह्यसंपर्क सत्रे आयोजित करण्यात आलेली असून, याबाबतची माहिती महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रांवर बालकांचे लसीकरण करण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.