पिंपरीत गोळीबारप्रकरणी चौघांना अटक, वाकड पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:59 AM2017-09-17T04:59:08+5:302017-09-17T04:59:13+5:30
गोळ्या झाडून संतोष कुरावत याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी पिंपरी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघे जण स्वत:हून वाकड पोलिसांकडे हजर झाले.
पिंपरी : गोळ्या झाडून संतोष कुरावत याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी पिंपरी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघे जण स्वत:हून वाकड पोलिसांकडे हजर झाले. सर्व राहणारे काळेवाडी येथील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे अन्य चार ते पाच साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी संतोष कुरावत याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात कुरवत हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी सचिन दत्तू नढे (वय २८), विकी शंभूसिंग सुतार (वय २३), विजय अरुण नढे (वय २३), अविनाश दत्तू नढे (वय २६) या आरोपींवर पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हल्लेखोर पिस्तुलासह पसार
फेब्रुवारी २०१७ मध्ये संतोष याने अपक्ष म्हणून महापालिका निवडणूक लढविली आहे. निवडणूक काळात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अन्य साथीदारांसह कोयते, पिस्तूल अशी हत्यारे घेऊन आले होते. त्यांनी संतोषवर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पिस्तूलसह हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष यास खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.