‘विश्वकर्मा’च्या अध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
By admin | Published: December 17, 2015 02:14 AM2015-12-17T02:14:49+5:302015-12-17T02:14:49+5:30
काळेवाडी येथील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या ३२ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी अध्यक्ष दिलीपकुमार दीनानाथ वेदपाठक (रा. संभाजीनगर, थेरगाव) यांच्यासह
वाकड : काळेवाडी येथील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या ३२ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी अध्यक्ष दिलीपकुमार दीनानाथ वेदपाठक (रा. संभाजीनगर, थेरगाव) यांच्यासह चार संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लेखापरीक्षक बी. टी. बोत्रे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोत्रे यांनी पतसंस्थेचे तीन वर्षांचे लेखापरीक्षण केले. २००८ ते २००९ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणात ५६ हजार ९१८ रुपये, २००९-१० मध्ये १ लाख ४७ हजार, २०१० या आर्थिक वर्षात ७२ हजार ९८० रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.
याबाबत पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिलेली माहिती अशी, की एका ठेवीदाराच्या २४ लाखांच्या ठेवीची कोठेही नोंद नाही. केवळ त्याला पावत्या देण्यात आल्या आहेत. त्या पावत्यांचे नूतनीकरण करून देतो, असे सांगून त्यावर कर्ज दाखविण्यात आले आहे. कर्जदाराने सोनेतारण कर्जाची पूर्ण परतफेड केली असताना पावणेपाच लाखांच्या कर्जाला कसलेच तारण दिसत नाही. अनेक खातेदारांची नावे आणि पत्ते
अपूर्ण आहेत. वाहनखरेदीसाठी
दोन लाखांची आगाऊ रक्कम
देऊन १ लाख ६० हजारांची पावती केली आहे. (वार्ताहर)