पिंपरीत चार पिस्तुल, २२ जिवंत काडतुसे जप्त, ३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 14:54 IST2019-06-04T14:54:14+5:302019-06-04T14:54:53+5:30
आदर्शनगर येथील एमबी चौकातील आरोपींकडे पिस्तुल व जिवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पिंपरीत चार पिस्तुल, २२ जिवंत काडतुसे जप्त, ३ जणांना अटक
पिंपरी : देशी बनावटीचे चार पिस्तुल व २२ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनाअटक केली आहे. मारुती विरभद्र भंडारी (वय ३०, रा. एमबी कॅम्प, मदिना मस्जिदजवळ, देहूरोड), सुलतान युसुफ खान (वय २०, रा. गांधीनगर, शिवाजी विद्यालयाजवळ, पंडीत चाळ, देहूरोड), सुमित उर्फ नकली उर्फ मारी गणेश पिल्ले (वय २७, रा. दत्त मंदीराच्या मागे, दांगट वस्ती, विकासनगर, देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक प्रवीण प्रकाश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड, आदर्शनगर येथील एमबी चौकातील बापदेवनगर येथील कॉलनी नंबर ८ येथे असलेल्या या आरोपींकडे पिस्तुल व जिवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींकडून एक लाख रुपये किंमतीचे चार देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल, ४ हजार ४०० रुपये किंमतीची २२ जिवंत काडतुसे तसेच त्यांच्याकडील (एमएच १४, एफसी १६२६) या क्रमांकाची मोटार असा एकूण ४ लाख ५४ हजार ४०० रुपये किंमतीचा माल जप्त केला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.