सराईत गुन्हेगाराकडून चार पिस्तूल, चार जिवंत काडतूस जप्त; भोसरी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 12:29 PM2020-12-03T12:29:13+5:302020-12-03T12:29:36+5:30
खाकी वर्दीला पाहून आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पिंपरी : खून, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, आर्म अॅक्ट, असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनीअटक केली. त्याच्याकडून चार पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. भोसरी पाेलिसांनी पांजरपोळ मैदान येथे मंगळवारी (दि. १) ही कारवाई केली.
रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (वय २८, रा. भोसरी, मूळ रा. धुळे), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पाटील हा पांजरपोळ शेजारील मोकळ्या मैदानाजवळ पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती भोसरी पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी गणेश सावंत व सुमित देवकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपी पाटील याच्याकडे एक गावठी कट्टा, तीन फॅक्टरी मेड पिस्तूल, असे एकूण चार पिस्तूल व चार जिवंत काडतूस, असा १ लाख ७५ हजार ८०० रुपये किंमतीचा ऐवज मिळून आला. खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, चोरी, आर्म अॅक्ट, असे आरोपी पाटील याच्याविरोधात देहूरोड, भोसरी, चिंचवड, भोसरी एमआयडीसी, दौंड आदी पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमीत देवकर, आशिष गोपी, संतोष महाडीक यांनी ही कामगिरी केली.