तळेगाव दाभाडे येथे पादचारी महिलेचे चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 06:07 PM2019-06-03T18:07:17+5:302019-06-03T18:08:43+5:30
काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पलायन केले.
तळेगाव दाभाडे : भाजी खरेदी करून घरी जात असलेल्या पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे ९२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकाविले. ही घटना रविवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास तळेगाव स्टेशन भागातील तपोधाम कॉलनी येथे सरस्वती शाळेजवळ घडली.या संदर्भात सोनाली संभाजी मराठे (वय३३,रा.भुशीगाव,लोणावळा,ता.मावळ,जि.पुणे)यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सोनाली मराठे या मुलांसह उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तळेगाव स्टेशन येथे माहेरी आल्या होत्या.भावजय सायली गायकवाड यांच्यासह त्यांनी रविवारी सायंकाळी स्टेशन भागातील शिवाजी चौक येथे भाजी खरेदी केली. त्यानंतर सरस्वती शाळेच्या मागील बाजूने तपोधाम कॉलनीतील घराकडे पायी जात असता काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पलायन केले.या घटनेमुळे शहर परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दोघेही चोरटे २५ते ३० वर्षे वयोगटातील असून अंगाने सडपातळ आहेत. दुचाकी चालकाच्या अंगात काळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने मंगळसूत्र खेचले असून त्याच्या अंगात पांढ?्या रंगाचा फुल बाह्यांचा टी शर्ट आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहे.