तळवडेत दुभाजकाला धडकून चारचाकी उलटली; सीटबेल्टमुळे चालकाचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:50 AM2017-12-02T11:50:58+5:302017-12-02T11:55:34+5:30
तळवडे महाळुंगे एम आय डी सी मार्गावर महाळुंगे (इंगळे) एमआयडीसी हद्दीत सकाळी ७.३० वाजता भरधाव वेगात असणारी चारचाकी दुभाजकाला धडकून चारही चाके वरती होऊन पलटी झाली.
रावेत : तळवडे महाळुंगे एम आय डी सी मार्गावर महाळुंगे (इंगळे) एमआयडीसी हद्दीत सकाळी ७.३० वाजता भरधाव वेगात असणारी चारचाकी (एमएच १४ डीएक्स ३४१७) दुभाजकाला धडकून चारही चाके वरती होऊन पलटी झाली. सुदैवाने वाहन चालकाला कसलीही इजा झाली नाही.
सकाळच्या वेळी वाहतूक तुरळक असल्याने या मार्गावरून धावणारी वाहने भरधाव वेगात असतात. त्यातच या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम चालू असल्याने सर्व खडी रस्त्यावर विखुरली असल्याने वाहने घसरत आहेत. सकाळी वेगात असणारी वॅगनर या खडीवरून घसरून समोरील डाव्या बाजूचा टायर फुटला व वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व गाडी दुभाजकाला धडकून काही अंतरावर जाऊन पलटी झाली. मागे मोठे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. याच मार्गावरून विरुद्ध दिशेने बेटलर कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस मधील कर्मचाऱ्यांनी ही घटना पहिल्यानंतर गाडीत अडकलेल्या वाहन चालकाला बाहेर काढले व २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी गाडी उचलून सरळ करून रस्त्याच्या कडेला घेतली.
या अपघातामुळे या मार्गावर तुरळक प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
सीट बेल्ट मुळे वाचले प्राण
भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकीच्या वाहन चालकाने वाहन चालविताना सीट बेल्ट लावल्यामुळे या मोठ्या अपघातात त्याला खरचटले सुद्धा नाही. घटनास्थळी गाडीची अवस्था पाहता निश्चितच यातील प्रवाशी गंभीर जखमी झाले असावेत, असे वाटत होते. परंतु चालक सर्वांशी बोलत असल्याचे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. नशीब बलवत्तर आणि वाहन चालविताना लावलेला सीट बेल्ट यामुळे वाहन चालकाचे प्राण वाचले.