पूर्ववैमनस्यातून चौघांवर टोळक्याचा हल्ला, चार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 03:06 AM2017-12-03T03:06:32+5:302017-12-03T03:06:37+5:30
पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करीत लाकडी दांडक्याने चार जणांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कासारवाडीतील हिराबाई झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी : पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करीत लाकडी दांडक्याने चार जणांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कासारवाडीतील हिराबाई झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर रमेश बोथ, उमेश सोमनाथ मिजार (वय १८), आमजद इस्माईल शेख (तिघे रा. कासारवाडी), मोसीन मेहबूब शेख (वय १९, रा. महादेवनगर, भोसरी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत कृष्णा गंगाराम जमादार (वय १७, रा. विकासनगर, कासारवाडी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कृष्णा जामदार याची चार दिवसांपूर्वी कासारवाडी येथे क्रिकेट स्पर्धेवेळी दुचाकी मागे घेण्यावरून आरोपींशी वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवारी कृष्णा आणि त्याच्या तीन मित्रांवर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. भोसरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मोहननगर येथील कंपनीत आग कार्यालयीन साहित्याचे नुकसान
पिंपरी : चिंचवड मोहननगर येथील ओंकार इंजिनिअरिंग कंपनीला शनिवारी सायंकाळी आग लागली. संत तुकारामनगर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या ३ बंबांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
मोहननगर येथील ओंकार इंजिनिअरिंग या कंपनीत मशिनचे सुटे भाग बनविण्यात येतात. मागील काही महिन्यांपूर्वी कंपनीचे उत्पादन युनिट इतर ठिकाणी हलविले आहे. मोहननगर येथील ही कंपनी मागील दोन महिन्यांपासून बंद होती. शनिवारी अचानक पाचच्या सुमारास कंपनीत आग लागली. कंपनी बंद असल्याने कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. कंपनीच्या कार्यालयातील संगणक व अन्य साहित्य जळाले.
बालकाच्या मृत्युप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल
बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह घरमालकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष शंकर पवार (वय ३) या बालकाचा २६ नोव्हेंबरला रहाटणी येथील बांधकाम साईटवरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार महेश पवार आणि घरमालक संग्राम होकर्णे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आयुषचे वडील युवराज धोत्रे (वय ४७, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रहाटणी येथे संग्राम होकर्णे यांच्या घराचे काम सुरू आहे. कामाचा ठेका महेश पवार यांच्याकडे आहे. युवराज धोत्रे त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करतात. धोत्रे बांधकाम साईटवर काम करत होते. त्या वेळी त्यांचा मुलगा आयुष बांधकाम साईटवर असलेल्या पाण्याच्या हौदात पडला. त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ठेकेदार पवार आणि घरमालक होकर्णे यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ठेकेदार आणि घरमालकाविरोधात बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.