हॉस्पिटलच्या संचालकपदाचे आमिष दाखवून ३९ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 04:00 PM2020-02-23T16:00:05+5:302020-02-23T16:01:21+5:30
हॉस्पिटल चालविण्यास घेऊन त्याच्या एका विभागाचे संचालक पद देण्याचे आमिष दाखवून एकाची ३९ लाखांची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे.
पिंपरी : हॉस्पिटल चालविण्यास घेऊन त्याच्या एका विभागाचे संचालक पद देण्याचे आमिष दाखविले. तसेच अडचणीत असलेल्या मेडिकल फाऊंडेशनसाठी २४ लाख रुपये घेतले. तसेच हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर झालेल्या शस्त्रक्रियेचे १५ लाख १६ हजार ६५१ रुपये दिले नाहीत. अशी एकूण ३९ लाख १६ हजार ६५१ रुपयांची फसवणूक केली. भोसरी येथे २५ मार्च २०१३ ते २२ फेब्रुवारी २०२० दरम्यान हा प्रकार घडला.
डॉ. अनुपमा दत्त माने (वय ५०, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विद्याधर प्रभाकर सरफरे, अंजली विद्याधर सरफरे, मेडिकल फाउंडेशनच्या ट्रेझरर दीपाली विवेक चिंचोले व अकॉर्ड मेडिप्लस कंपनीच्या सेक्रेटरी मालविका मॉल (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांची संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल प्रा. लि. संत ज्ञानेश्वर मेडिकल फाउंडेशन ही संस्था अडचणीत असताना त्यांनी फिर्यादी यांच्याकडे रक्कम मागितली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी २४ लाख रुपये दिली. तसेच हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचे १५ लाख १६ हजार ६५१ रुपये होते. असे एकूण ३९ लाख १६ हजार ६५१ रुपये सदरच्या संचालक मंडळाकडून येणे अपेक्षित होते. मात्र आरोपी यांनी संगनमत करून फसवणूक करण्याच्या इराद्याने जुन्या कार्यकारी मंडळाकडून संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल व संत ज्ञानेश्वर मेडिकल फाउंडेशन हे हॉस्पिटल कराराव्दारे चालविण्यास घेतले. फिर्यादी यांना कॅन्सर विभागाचे संचालक पद देण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यांची येणे बाकी असलेली ३९ लाख १६ हजार ६५१ रुपये न देता आर्थिक फसवणूक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.