ओटीपी नंबरची माहिती घेऊन 70 हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 08:03 PM2019-06-30T20:03:08+5:302019-06-30T20:04:30+5:30
ओटीपी नंबरची माहिती घेत बँक खात्यातून परस्पर ७० हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करुन एकाची फसवणूक करण्यात आली आहे.
पिंपरी : ओटीपी नंबरची माहिती घेत बँक खात्यातून परस्पर ७० हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करुन एकाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहु श्रीरंग शिंदे (वय ४३, रा. शिवनेरी रेसीडेन्सी, औंध मिलीटरी कॅम्प, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १७ जूनला लहु शिंदे यांनी अशोक मोटर्स यांचे उज्जैन स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यामध्ये २२ हजार रुपये ट्रान्सफर केले. ही रक्कम अशोक मोटर्स यांच्या खात्यावर गेल्यानंतर लगेचच त्यांच्या खात्यामधून डेबीट झाली. याबाबत शिंदे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भिम अॅपवरुन कस्टमर केअरला तक्रार केली असता एकाने शिंदे यांना ‘तुमचे पैसे तुम्हाला रिफंड होतील परंतु तुम्हाला आलेला ओटीपी नंबर सांगा’ असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शिंदे यांना प्राप्त झालेला ओटीपी मिळवून शिंदे यांच्या खात्यातून ७० हजार रुपये आरोपीने स्वत:च्या अकाऊंटला ट्रान्सफर केले. या फसवणुकीबाबत शिंदे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.