नाशिक ‘प्रेस’च्या बाद नोटा देण्याचे सांगत फसवणूक; १० लाख रुपये घेऊन दिल्या चिल्ड्रेन बँकेच्या नोटा
By नारायण बडगुजर | Published: April 1, 2024 04:57 PM2024-04-01T16:57:59+5:302024-04-01T16:58:36+5:30
फसवणुकीचा हा प्रकार निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरमध्ये ३० नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला....
पिंपरी : चलनी नोटांच्या बदल्यात तीन पट किमतीच्या नाशिक येथील ‘करन्सी नोट प्रेस’मध्ये बाद झालेल्या नोटा मिळवून देण्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर हाॅटेल व्यावासायिकाकडून १० लाख रुपये घेऊन त्याला ३० लाखांच्या करन्सी नोट प्रेसमधील नोटा देण्याचा बहाणा केला. मात्र, त्या चलनी नोटा नसून चिल्ड्रेन बँकेच्या नोटा असल्याचे समोर आले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. फसवणुकीचा हा प्रकार निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरमध्ये ३० नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
आकाश सत्यवान शेटे (३०, रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव, जि. पुणे), सचिन एकनाथ नरवडे (३७, रा. मोशी), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासह तुषार टेके आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुभम भगवान सोनावणे (२८, रा. चऱ्होली) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ३१) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम सोनावणे यांचा हाॅटेलचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी शुभम यांच्या हाॅटेलच्या बाधकामानिमित्त त्यांचा आकाश शेटे याच्याशी संपर्क होऊन ओळख झाली. शेटे आणि त्याच्या साथीदारांनी शुभम यांना पैसे कमावून देण्याबाबत सांगितले. नाशिक येथील चलार्थ पत्र मुद्रणालय (करन्सी नोट प्रेस) येथे आपली ओळख आहे. तेथे छापल्या जाणाऱ्या काही नोटा बाद होतात. मात्र, तरीही त्या चलनात वापरल्या जातात. करन्सी नोट प्रेसमध्ये बाद झालेल्या नोटा उपलब्ध करून देणारी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे, असे त्यांनी फिर्यादी शुभम यांना सांगितले. त्या नोटा सहज चलनात वापल्या जाऊ शकतात, असे पटवून देत चलनी नोटा छपाईबाबतचा एक व्हिडिओ शुभम यांना दाखवला. तुम्ही दिलेल्या रकमेवर तीन पट जास्तीच्या किमतीच्या नोटा नाशिक येथून आणून देतो, असे सांगून त्यांनी फिर्यादी शुभम यांचा विश्वास संपादन केला.
शुभम यांनी त्यांना पैसे देण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरमध्ये शुभम यांच्याकडून १० लाख रुपये घेऊन त्यांना ३० लाख रुपये दिले. आता तुम्ही येथे थांबू नका, असे सांगून संशयित तेथून निघून गेले. त्यानंतर शुभम यांनी घरी येऊन नोटा तपासल्या. त्यात चिल्ड्रेन बँकेच्या नोटा होता. त्यामुळे शुभम यांनी आकाश शेटे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दिवस त्याचा मोबाइल फोन बंद होता. त्यानंतर संपर्क झाला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्ही दिलेल्या नोटा खऱ्या होत्या, असा बनाव केला. मात्र, शुभम यांनी तगादा लावल्याने त्यांचे पैसे परत देण्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही पैसे दिले नाहीत. त्यामुळे शुभम यांनी निगडी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आकाश शेटे आणि सचिन नरवडे यांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख तपास करीत आहेत.
आणखी किती जणांना गंडवले?
दरम्यान, हे प्रकरण बनावट नोटांचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, पोलिसांनी तपास केला असता चिल्ड्रेन बँकेच्या नोटा असल्याचे समोर आले. संशयित आकाश शेटे आणि त्याच्या साथीदारांनी यापूर्वीही अशाच पद्धतीने कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बनावट नोटांचे प्रकरण गाजतेय
घरातच नोटांची छपाई करून त्या चलनात वापरण्याचा प्रयत्न हिंजवडी आयटी पार्कमध्ये झाला होता. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करून प्रकार उघडकीस आणला. त्या पाठोपाठ चीनी कंपनीकडून कागद मागवून त्यावर भारतीय चलनी नोटांची छपाई केल्याचा प्रकारही देहूरोड पोलिसांनी उघडकीस आणला. त्यापाठोपाठ नाशिक करन्सी नोट प्रेसमधील बाद नोटा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करत चिल्ड्रेन बँकेच्या नाेटा देण्याचा प्रकार निगडीत उघडकीस आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.