Pune: आर्मीमध्ये भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक; सेवानिवृत्त झालेल्या दोघांसह एका एजंटला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:24 PM2022-01-06T17:24:18+5:302022-01-06T17:37:51+5:30

व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून हजारो रुपये घेऊन फसवणूक केली...

fraud in the lure of enlistment in the army agent was handcuffed crime news | Pune: आर्मीमध्ये भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक; सेवानिवृत्त झालेल्या दोघांसह एका एजंटला बेड्या

Pune: आर्मीमध्ये भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक; सेवानिवृत्त झालेल्या दोघांसह एका एजंटला बेड्या

Next

पिंपरी: आर्मीमध्ये बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (GREF) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून हजारो रुपये घेऊन फसवणूक केली. आर्मी इंटेलिजन्सने याप्रकरणी तीन संशयिताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आर्मीमधून सेवानिवृत्त झालेल्या दोघांसह एक एजंटचा त्यात समावेश आहे. सतीश कुंडलिक डहाणे (वय ४०, रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम, अक्षय देवलाल वानखेडे (रा. तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गजानन पुरुषोत्तम मिसाळ (वय २३, रा. भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अमरावती येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात मोटार मेकॅनिक पदावर अ‍ॅप्रेंटीसशिप करत आहेत. फिर्यादी व त्यांचे मित्र धनंजय वट्टमवार यांना आरोपी अक्षय वानखेडे याने बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) या आर्मीच्या भरतीमध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदासाठी नोकरीस लावतो, असे आमिष दाखवले. हे काम आरोपी सतीश डहाणे याच्या सांगण्यावरून करत असल्याचे अक्षय याने सांगितले. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या मित्राकडून भरतीसाठी ७० हजार रुपये घेतले. फिर्यादी व फिर्यादीचे मित्र धंनजय वट्टमवार (वय २१), नीलेश ईश्वर निकम (वय २३, रा. मु. पो. आगार खुर्द, ता. मालेगाव, जि. नाशिक), अक्षय बाळु सांळुखे (वय २५, रा. खेडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे ४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी तीनच्या सुमारास रक्षक चौक, औंध मिलिटरी कॅम्पच्या समोर भरतीसाठी आले.

दरम्यान, या प्रकरणाची मिलिटरी इंटेलिजन्सला कुणकुण लागली. मिलिटरी इंटेलिजन्सने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना ताब्यात घेऊन सांगवी पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आर्मी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, रोख रककम, कॉम्प्युटर, पेन ड्राइव्ह, दोन दुसऱ्याच्या नावे असलेले रबरी शिक्के, मिलिटरीचे स्वतःचे बनावट ओळखपत्र, वेगवेगळी बनावट एनव्हलप, कमांडट ग्रेफ सेंटर यांचे ॲकनॉलेज कार्ड, बीआरओचे भरतीचे अ‍ॅडव्हटाईज नंबर २/२०२१ चे उमेदवारांचे भरलेले फॉर्म, इत्यादी कागदपपत्रे, तसेच उमेदवांराच्या शैक्षणिक पात्रतेची झेरॉक्स प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड व आटीलरी नाशिक रोड कॅम्प यांचे अ‍ॅप्लीकेशन फॉर्म इत्यादी ताब्यात घेतले. 

फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रांना नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे तपास करीत आहेत. 

मोठे रॅकेट असण्याची शक्यता-
आर्मीच्या बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदासाठी ३० ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परीक्षा झाली होती. त्यात भरती करण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता आहे. त्यासाठी यात मोठे रॅकेट असण्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. 

आर्मीतील सेवानिवृत्तांच्या सहभागाने खळबळ-
आरोपी सतीश डहाणे व श्रीराम कदम हे दोघेही सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत. यातील डहाणे हा सैन्यदलात शिपाई तर आरोपी कदम हा ‘गवंडी’ म्हणून कार्यरत होता. आरोपी अक्षय वानखेडे हा याप्रकरणा एजंट म्हणून काम करीत होता, असे समोर आले आहे. यात आणखी कोणाचा सभाग आहे, तसेच आणखी किती जणांची आरोपींनी फसवणूक केली आहे, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: fraud in the lure of enlistment in the army agent was handcuffed crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.