चाकणच्या जर्मन कंपनीतील उच्चपदस्थांकडून तब्बल १३९ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:45 AM2022-03-23T11:45:14+5:302022-03-23T11:45:24+5:30

एचयूएफ या कंपनीतील उच्च पदावर काम करीत असलेल्या तीन उच्चशिक्षित अधिकाऱ्यांना अटक झाली

Fraud of Rs 139 crore from top brass of a German company in Chakan | चाकणच्या जर्मन कंपनीतील उच्चपदस्थांकडून तब्बल १३९ कोटींची फसवणूक

चाकणच्या जर्मन कंपनीतील उच्चपदस्थांकडून तब्बल १३९ कोटींची फसवणूक

Next

पिंपरी : खोट्या पर्चेस आर्डर्सव्दारे १३९ काेटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०१० ते मे २०२० या कालावधीत एचयुएफ इंडीया प्रा. लि. नानेकरवाडी, चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथे घडला. याप्रकरणी एचयूएफ या कंपनीतील उच्च पदावर काम करीत असलेल्या तीन उच्चशिक्षित अधिकाऱ्यांना अटक झाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 

विशाल विनयकुमार टमोटिया (वय ४५, रा. मोशी), निखील नरेंद्रकुमार आगरवाल (वय ४५, रा. कस्पटेवस्ती, वाकड), संदीप राधाकृष्ण वाणी (वय ५६, रा. लिंक रोड, चिंचवड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह सुनील कुमार गर्ग याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एचयूएफ कंपनीचे संचालक असलेले संदीप जगदीश चौधरी (वय ४५, रा. नानेकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी १४ मार्च २०२२ रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानेकरवाडी येथील एचयूएफ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील गर्ग, फायनांन्स हेड निखील अगरवाल, ऑपरेशन संदीप वाणी व आटी हेड विशाल टमोटीया यांनी आपसात संगणमत करून पदाचा गैरवापर केला. कंपनीचे इतर संचालक व जर्मनी येथील मुख्य कंपनी एचयूएफ हल्सबेक अँण्ड फुर्स्ट जीएमबीएच अँण्ड कंपनी केजी, बेल्बर्ट यांना कंपनीचे पर्चेस हेड श्रीपाद कुलकर्णी व त्यांच्या टिमला कोणतीही माहिती न देता आरोपींनी खोट्या परचेस ऑर्डर्स् सिरीज तयार केल्या. त्याव्दारे वेगवेगळ्या व्हेन्डरकडून खोटे इनव्हाईस घेऊन, त्या इनव्हाईसवर कंपनीच्या खोटा स्टॅम्पच्या वापर करून, खोटे गुड्स रिसीट नोटस (जीआरएन) बनविले. इनव्हाईसमधील माल कंपनीमध्ये न आणता मेनगेट रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी केल्या. या इनव्हाईसमधील मालाच्या बिलाची रक्‍कम सर्व व्हेन्डरला कंपनीच्या बँक खात्यामधुन दिली. 

वेगवगेळ्या एनजीओला आवश्यकता नसतानाही डोनेशन व सीएसआरव्दारे मोठ्या प्रमाणात रक्‍कम देऊन व अशाच वेगवेगळ्या प्रकारचे इतर गैरव्यवहार करून, आरोपींनी एचयूएफ कंपनीची १३९ कोटी रुपयांची फसवणूक केली. ही रक्‍कम वेगवेगळ्या मार्गाने स्वतःच्या व कुटुंबियांच्या नावे घेऊन एचयूएफ कंपनीच्या पैशांचा अपहार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

एचयूएफ कंपनीत विविध प्रकारचे इलेक्ट्राॅनिक्स पार्ट तयार केले जातात. कंपनीच्या विद्यमान संचालकांनी कंपनीचे फाॅरेन्सिक ऑडिट केले. त्यातून गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला. त्यानुसार अपहार प्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला. आरोपींच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषन करून आरोपींचे ‘लोकशन’ मिळविले. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी आरोपी विशाल टमोटिया, निखील आगरवाल, संदीप वाणी यांना अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Web Title: Fraud of Rs 139 crore from top brass of a German company in Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.