महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

By नारायण बडगुजर | Updated: March 15, 2025 17:04 IST2025-03-15T17:02:56+5:302025-03-15T17:04:38+5:30

ठेकेदार कंपनीसह इतर दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Fraud of Rs 21 lakhs with the lure of a job in the municipal corporation | महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी महापालिकेच्या ठेकेदार कंपनीसह इतर दाेघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालय आणि पिंपरी येथील एका हाॅटेलमध्ये सप्टेंबर २०२३ ते २८ जून २०२४ या कालवधीत हा प्रकार घडला.


सचिन छब्बानी सूर्यवंशी, मिलिंद पाध्ये व एजी इन्व्हायरो कंपनी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल भास्कर गर्जे (३५, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (१४ मार्च) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल गर्जे यांना संशयित सचिन सूर्यवंशी आणि कंपनीच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी असणारा संशयित मिलिंद पाध्ये आणि इन्व्हायरो कंपनी यांनी नोकरीला लावतो असे आमिष दाखवले.

फिर्यादी गर्जे यांचा विश्वास संपादन करून गर्जे यांच्याकडून व त्यांच्या साथीदारांकडून २१ लाख २० हजार रुपये ऑनलाइन तसेच रोख स्वरुपात घेतले. मात्र, कोणत्याही प्रकार नोकरी दिली नाही. फिर्यादीने पैशांची वारंवार मागणी करून देखील संशयितांनी त्यांना पैसे परत न देता त्यांच्या पैशांचा अपहार केला. तसेच अश्विनी गायसमुद्रे आणि विशाल खांदवे यांच्या पैशांचा देखील अशाच प्रकारे अपहार करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस निरीक्षक धनंजय कापरे तपास करीत आहेत. 


सुपरवायजर, आरोग्य विभागात नोकरीचे आमिष

एजी इन्व्हायरो कंपनी ही महापालिकेतील ठेकेदार कंपनी आहे. ही कंपनी सुपरवायजर तसेच आरोग्य विभागातील विविध पदांसाठी भरती करत असते. फिर्यादी गर्जे आणि त्यांच्या साथीदारांना देखील सुपरवायजर आणि इतर पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने गंडा घालण्यात आला. 


किती जणांची फसवणूक?

या प्रकरणात संशयितांनी आणखी किती जणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली याबाबत चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Web Title: Fraud of Rs 21 lakhs with the lure of a job in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.