Pimpri Chinchwad: क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 03:22 PM2023-08-05T15:22:59+5:302023-08-05T15:25:02+5:30
ही घटना २० जुलै ते २६ जुलै या कालावधीत किवळे येथे घडली....
पिंपरी : क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास ३० टक्के नफा मिळेल, असे सांगत चार जणांनी मिळून एका व्यक्तीची सहा लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २० जुलै ते २६ जुलै या कालावधीत किवळे येथे घडली.
यशपाल दिलीप बनसोडे (वय ३७, रा. किवळे. मूळ रा. आंदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला, महेश अग्रवाल, आदित्य बन्सल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका आरोपी महिलेने टेलिग्रामवर पार्टटाइम जॉबसाठी एक लिंक पाठवली. त्यानंतर अन्य आरोपींनी क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास ३० टक्के अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर, युपीआय आयडीवर ६ लाख ४५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता फिर्यादींची फसवणूक केली.