इंजिनिअर महिलेची दोन लाख ७० हजार रुपयांची फसवणूक
By नारायण बडगुजर | Published: April 22, 2024 07:56 PM2024-04-22T19:56:20+5:302024-04-22T19:56:49+5:30
आयसीआयसीआय बँकेत महिलेचे खाते असून त्या खात्यातून वेगवेगळे ट्रान्जेक्शन करून एकूण दोन लाख ७० हजार रुपये वळते करून घेतले
पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेच्या बँक खात्यातून पैसे वळते करून घेऊन दोन लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे ३० मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी २५ वर्षीय साॅफ्टवेअर इंजिनिअर महिलेने रविवारी (दि. २२) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला साॅफ्टवेअर इंजिनिअर असून त्या एका खासगी आयटी कंपनीत नोकरीला आहेत. त्या घरी असताना त्यांना आयसीआयसीआय बँकेतून फोन आला. आयसीआयसीआय बँकेत महिलेचे खाते असून त्या खात्यातून वेगवेगळे ट्रान्जेक्शन करून एकूण दोन लाख ७० हजार रुपये वळते करून घेतले. याबाबत आयसीआयसीआय बँकेतून फिर्यादी महिलेला फोनवरून माहिती देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम शेळके तपास करीत आहेत.