Pune Crime| चिखलीत निवृत्त पोलिसाची दोन लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 08:15 PM2022-09-17T20:15:02+5:302022-09-17T20:20:01+5:30
आरोपी विरोधात गुन्हा दाखल...
पिंपरी : आपली एमआयडीसी अधिकाऱ्यांशी ओळख आहे. तुमच्या मुलाला एमआयडीसीमध्ये नोकरी लावून देतो, अशी बतावणी मारून निवृत्त पोलिसाची तब्बल दोन लाख रुपयांना फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत चिखली येथे घडली. या प्रकरणी भगवान गेणु म्हस्के (वय ५७, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी संजय धोंडीबा गेणू म्हस्के, ठकसेन धोंडीबा पवार (दोघे रा. जेऊर ता. पुरंदर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त पोलीस आहे. त्याचा मुलगा प्रतिक हा नोकरीच्या शोधात होता. आरोपींनी आपली पश्चिम महाराष्ट्रामधील एमआयडीसी अधिकाऱ्यांशी ओळख आहे असे सांगत तुमच्या मुलाला एमआयडीसीमध्ये नोकरी लावून देतो, त्यासाठी दोन लाख रुपये देण्याची मागणी फिर्यादी यांच्याकडे केली. आपण नोकरी लावण्यासाठी चार ते पाच लाख रुपये घेतो मात्र तुम्ही ओळखीचे आहात म्हणून दोन लाख घेतो, असे देखील आरोपींनी सांगितले.
फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले. मात्र, आरोपी यांनी फिर्यादीच्या मुलाला नोकरी न लावता फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.