पिंपरीतील एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेशाच्या बहाण्याने डाॅक्टर तरुणीला २० लाखांना गंडा
By नारायण बडगुजर | Published: April 4, 2024 05:46 PM2024-04-04T17:46:10+5:302024-04-04T17:46:29+5:30
तळवडे आणि पिंपरी येथे जानेवारी २०२३ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली....
पिंपरी : एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पिंपरी एका मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तरुणीची १९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तळवडे आणि पिंपरी येथे जानेवारी २०२३ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
विशाल पवार, भास्कर राव, कुलभूषण कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फसवणूक झालेल्या २६ वर्षीय तरुणीने याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वैद्यकीय अभ्यासक्रमातील ‘बीएएमएस’पर्यंत शिक्षण झाले आहे. डाॅक्टर असलेल्या या तरुणीला उच्चशिक्षणासाठी ‘एमडी’ या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. संशयितानी भास्कर राव हे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात काम करत असल्याचे फिर्यादी तरुणीस खोटे सांगितले. फिर्यादी तरुणीस एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमाला व्यवस्थापन कोट्यातून पिंपरीतील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
फिर्यादी डाॅक्टर तरुणीचे वडील शिक्षक असून त्यांनी कर्ज काढून संशयितांना १९ लाख ७५ हजार रुपये दिले. त्यानंतर फिर्यादी तरुणीने प्रवेशासाठी तगादा लावला. मात्र, संशयितांनी टाळाटाळ केली. त्यावरून फिर्यादी तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर संशयितांनी पैसे देण्याचे लेखी स्वरुपात मान्य केले. त्यासाठी फिर्यादी तरुणीला धनादेश दिले. मात्र, धनादेश वटले नाहीत. त्यामुळे फिर्यादी तरुणीने पुन्हा पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.
शैक्षणिक वर्ष गेले वाया
फिर्यादी तरुणीने गेल्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, संशयितांनी तरुणीचा विश्वास संपादन त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र, प्रवेश न मिळवून देता फसवणूक केली. यात तरुणीचे शैक्षणिक वर्ष वाया गेले.