लॉटरी लागल्याचे सांगून व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 07:01 PM2019-06-09T19:01:57+5:302019-06-09T19:03:33+5:30
शंभर काेटीची लाॅटरी लागली असल्याचे सांगून विविध चार्चेसच्या नावाखाली व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.
पिंपरी : मित्राला शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याचे पैसे व्यावसायिकाच्या खात्यात जमा करायचे आहेत, असे आमिष दाखविले. वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली १ कोटी ५२ लाख २७ हजार ४०० रुपये बँकेच्या खात्यात भरण्यास सांगितले. १४ जणांनी मिळून एका व्यावसायिकाची फसवणूक केली. केरळ, दिल्ली आणि वाकड येथे आॅगस्ट २०१२ ते एप्रिल २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राकेश गंगाधर कोटोल (वय ४४, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा फिर्यादी राकेश यांना फोन आला. त्यांचे मित्र के. शिवदासन यांना शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याचे पैसे राकेश यांच्या खात्यावर जमा करायचे आहेत. त्यासाठी जीएसटी, ट्रान्सफर चार्जेस, ड्युमरेज चार्जेस, कन्वर्जन चार्जेस, मनी लाँडरिंग चार्जेस, प्रोसेसिंग फी, स्टॅम्प चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस आणि हॉटेल बिल अशा विविध चार्जेसच्या नावाखाली पैशांची मागणी केली. वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये राकेश यांच्याकडून खात्यावर १ कोटी ५२ लाख २७ हजार ४०० रुपये घेतले. सर्व प्रकारच्या चार्जेसचे पैसे देऊनही आरोपींनी लॉटरीचे पैसे राकेश यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राकेश यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.