म्हाळुंगेतील शोरुममध्ये सव्वा कोटीचा अपहार ; आठ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 08:51 PM2020-11-10T20:51:18+5:302020-11-10T20:53:06+5:30
इन्शुरन्सची बनावट पाॅलिसी करून ग्राहकांची फसवणूक
पिंपरी : ग्राहकांचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून एक कोटी १ लाख २९ हजार ४४० रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार म्हाळुंगे येथील सुमन कीर्ती कार या शोरुममध्ये उघडकीस आला आहे.
विजयकुमार गोवर्धन कादे (वय ३९, रा. पंढरपूर) यांनी सोमवारी (दि. ९) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मॅनेजर योगेश आरुलकर, प्रसाद भादुले, भानुप्रसाद गड्डे, टेलीकॉलर कल्पना बिक्कड, हितेश कुचेरिया, कॅशियर सोनाली ढगे, मंदाकिनी रेडकर, राजरतन भिसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोरुममध्ये इन्शुरन्स पाॅलिसीचे ग्राहकांकडून आलेले पैसे तसेच वर्कशॉपमधील बिलापोटी जमा झालेली रक्कम असे एकूण एक कोटी १ लाख २९ हजार ४४० रुपये आरोपी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. तसेच आरोपी यांनी काही बनावट इन्शुरन्स पाॅलिसी तयार केल्या. त्या ‘पाॅलिसी’ खऱ्या असल्याचे सांगून आरोपी यांनी त्याचेही पैसे ग्राहकांकडून घेतले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी कादे यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला.