गिफ्ट व्हाऊचर पडले दीड लाखाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 07:44 PM2019-05-05T19:44:31+5:302019-05-05T19:46:29+5:30
अॅमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाऊचरमध्ये निवड झाल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळया वस्तूंचे आमिष दाखवून एका तरुणाची १ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी : अॅमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाऊचरमध्ये निवड झाल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळया वस्तूंचे आमिष दाखवून एका तरुणाची १ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी रजत बैकुंट गुप्ता (वय २४, रा. गितांजली पी.जी., हिंजवडी फेज १, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील आरोपीने गुप्ता यांना त्यांची अॅमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाऊचरमध्ये त्यांची निवड झाल्याचे खोटे सांगितले. कंपनीच्या लिंक मॅसेजद्वारे मॅसेज करुन गुप्ता यांना लॅपटॉप, फ्रीज, मोबाईल, एसी यापैकी एक वस्तु निवडण्यास सांगितले. त्यानुसार मोबाईल निवडल्याचे गुप्ता यांनी सांगितले असता अॅमेझॉनकडे दुसरी ऑर्डर करा म्हणजे मोबाईल पाठविता येईल, असे सांगितले. त्यानंतर गुप्ता यांनी दुसरी ६ हजार ४२३ रुपयांची ऑर्डर मागविली. परंतु, ऑर्डर दिल्यानंतर आरोपीने कोणतीही वस्तू दिली नाही.
वेळोवेळी पैसे परत करण्याचा बहाणा करुन गुप्ता यांना कर्नाटक, युनियन व अलाहाबाद या बँक खात्यात एकूण १ लाख ४६ हजार ४३४ रुपये भरण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही मोबाईल अथवा पैसे परत न देता गुप्ता यांची फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.