शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By नारायण बडगुजर | Published: March 16, 2024 10:34 PM2024-03-16T22:34:51+5:302024-03-16T22:35:15+5:30
पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांकडून दोघांना अटक
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
विकास नेमीनाथ चव्हाण (४३, रा. गणेश नगर, नवी सांगवी), प्रदीप कृष्णा लाड (३२, रा. पिंपळे गुरव, सांगवी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील महिलेला फेसबुकवरून गुंतवणूक संदर्भातील पोस्ट शेअर करून व्हाॅटसअप ग्रुपमध्ये सहभागी केले. जास्त परताव्याच्या आमिषाने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास सांगितले. तसेच लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करायला सांगितले. महिलेने भरलेले पैसे व नफा ॲपवर दिसत होता. परंतु ॲपवरून पैसे काढून घेता येत नव्हते. यात त्यांची १० लाख ६९ हजार ५७५ रुपयांची फसवणूक झाली. महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी तांत्रिक विश्लेष केले असता विकास चव्हाण याच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. प्रदीप लाड याने विकास याला बँक खाते सुरू करण्यास सांगितल्याचे समोर आले. त्यामुळे प्रदीपला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले. न्यायालयाने दोघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यातील आणखी संशयितांचा शोध सुरू आहे. तसेच गुंतवणूक केलेले पैसे नेमके कोणत्या खात्यावर गेले, कोणी काढून घेतले याचा शोध सुरू आहे.
फिर्यादी महिलेने विकास चव्हाण व इतर ११ बँक खात्यांमध्ये पैसे भरले. या खात्यांमधून ५० कोटींपेक्षा जास्तीच व्यवहार झाले. अटक केलेल्या दाेघांच्या विरोधात इतर राज्यात २० तक्रारी आहेत. प्रदीप लाड याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमन, पोलिस अंमलदार नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, कृष्णा गवळी, रजनिश तारु यांच्या पथकाने ही कामगिरी केली.