महापालिकेची कामे मिळविण्यासाठी खोटे दाखले सादर करून फसवणूक; दोन ठेकेदारांविरोधात पिंपरीत गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:47 PM2021-07-03T18:47:37+5:302021-07-03T18:47:55+5:30
पिंपरी महापालिकेची कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांनी अनुभवाचे बनावट कागदपत्रे सादर केले.
पिंपरी : महापालिकेची कामे मिळविण्यासाठी अनुभवाचे बनावट कागदपत्रे सादर केले. महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या प्रकरणात मे. राजेश इंजिनिअर्स ॲन्ड कंपनीचे मालक रेवजी सहादू घाडगे (वय ६९, रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी रामनाथ निवृत्ती टकले (वय ५५, रा. रावेत) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २) फिर्याद दिली. ही घटना २४ मार्च २०१९ रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घाडगे याने हिंदूस्थान ऍन्टीबायोटिक्स लिमिटेड या शासकीय संस्थेचे खोटे अनुभवाचे प्रमाणपत्र तयार करून ते पिंपरी -चिंचवड महापालिकेला सादर केले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे एक कोटी दोन लाख ९१ हजार ९८२ रुपयांचे निविदेद्वारे काम मिळवून महापालिकेची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात मे. संजीवन प्रिसीजनचे प्रो. संजीव यशंवत चिटणीस (वय ६५, रा. बिबेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेचे अधिकारी प्रवीण विठ्ठल लडकत यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २) फिर्याद दिली. ही घटना ७ ते २१ जानेवारी २०२१ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काम मिळविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडे निविदा भरली. त्यासाठी पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभागातील पर्वती जल शुद्धीकरण केंद्र येथे क्लोरीन साठवणुकसाठी शेड उभारणे, दहा किलो/ तास क्षमतेचे क्लोरिनेटर्स पुरवणे, क्लोरीन न्युट्रलायझेशन यंत्रणा बसविणे व तद्अनुषंगिक कामे केले असल्याचा कार्यकारी अभियंता (विद्युत) कार्यालयाकडील २९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा बनावट दाखला तयार केला. तो दाखला महापालिकेकडे सादर करून महापालिकेची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे तपास करीत आहेत.