पिंपरीत विजेचा लपंडावाचा खेळ ; लूट व मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 08:25 PM2020-09-22T20:25:12+5:302020-09-22T20:26:08+5:30
अंधाराचा फायदा घेत कर्मचाऱ्यांना लुटणे, मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे....
पिंपरी : उद्योगनगरीत वारंवार होणारा विजेचा लंपडाव...पदपथावरील नादुरुस्त दिव्यांअभावी होणारा अंधार...फिडर पिलरच्या झाकणांची होणारी चोरी...उघड्या यंत्रणेमध्ये उंदीर, पाली यामुळे जाणारी वीज..अशा प्रकारामुळे सायंकाळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत कर्मचाऱ्यांना लुटणे, मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
भोसरी एमआयडीसी परिसरात पाच ते सहा हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. जिल्ह्यातून दररोज लाखो कामगार पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत असतात. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वारंवार जाणाऱ्या विजेमुळे काम बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यातच आता पदपथावरील दिवे नादुरुस्त होणे आणि देखभाल दुरुस्तीअभावी ते बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांचा उद्योग सुरू आहे. कामावर जाण्याच्या वेळेत अथवा सुटण्याच्या वेळेत कामगारांना अडवून त्यांना लुटण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. कामगारांना मारहाण करणे, त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढणे, मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा तर मोबाइलवर बोलत असताना गाडीवरून वेगात आलेले चोरटे हातातील मोबाइल हिसकावून नेत आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्येही अशा घटनांची सातत्याने नोंद होत आहे.
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले, ‘‘ एमआयडीसी परिसरातील नवीन पदपथ दिवे देखील लवकर खराब होत आहेत. एलईडी दिवे दुरुस्तीला दिल्याचे सांगण्यात येते. स्थानिक पातळीवर त्याची दुरुस्ती करता येत नाही. कंपनीमध्ये पाठविल्यास त्यासाठी दहा-दहा दिवस लागतात. तोपर्यंत परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. ’’
भोसरी एमआयडीसीमधील उद्योजक वैभव जगताप म्हणाले, पदपथावरील दिवे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना लुटण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. काही कामगार यात जखमी देखील झाले आहेत. रात्री घरी जाताना कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असते. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी काढून नेलेले दिवे दहा-दहा दिवस बसविले जात नाहीत. तोपर्यंत तेथे अंधार पसरतो. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत झाली पाहिजेत. त्याचबरोबर औद्योगिकनगरीत पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे.
--------------------
एमआयडीसी परिसरातील विजेचे अनेक खांब जुनाट झाल्याने वारंवार अपघात होत असतात. फिडर पिलरचे दरवाजे नाहीसे झाले आहेत. त्यात उंदीर, घुशी शिरल्याने अपघात होतात. विशेषत: पदपथावरील दिवे नसल्याने परिसरात अंधार होतो. त्यामुळे लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. महानगरपालिकेने यावर उपाययोजना करून उत्कृष्ट दर्जाचे दिवे लावावेत.
अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
---------