कडाका वाढला अन् गरिबांचा ‘फ्रिज’ महागला ! कच्च्या मालाचे दर वाढल्याने माठ महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 06:56 AM2018-03-01T06:56:45+5:302018-03-01T06:59:48+5:30
थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा पारा उंचावला आहे. नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे गरिबांचा ‘फ्रिज’ संबोधल्या जाणा-या माठांचे येथील बाजारात आगमन झाले आहे.
मोशी : थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा पारा उंचावला आहे. नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे गरिबांचा ‘फ्रिज’ संबोधल्या जाणा-या माठांचे येथील बाजारात आगमन झाले आहे. मात्र, माठांसाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने यंदा माठांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा दुप्पट राहणार आहेत.
नाशिक रस्ता, मोशी व भोसरीमध्ये लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी आहे. होळीनंतर माठांची मागणी वाढणार असून, या बाजारात तेजी येईल, असा माठ व्यावसायिकांचा अंदाज आहे.
सर्वसामान्य आणि गरिबांकडून उन्हाळ्यात माठाला सर्वाधिक मागणी असते. असे असले तरीही आता उच्चभ्रू नागरिकांकडूनही माठाला पसंती देण्यात येत आहे. अशा उच्चभ्रूंकडून नक्षीकाम केलेल्या पांढ-या किंवा लाल माठाला अधिक पसंती असते. यात चिनी मातीपासून तयार केलेल्या माठांचे प्रमाण जास्त असते. परराज्यातील विक्रेते अशा तयार माठांची विक्री करतात. असे माठ तयार करण्यासाठी कारखाने सुरू झाले आहेत. परिणामी पारंपरिक पध्दतीने व्यवसाय करणाºया कुंभारबांधवांना या स्पर्धेत टिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
उच्चभ्रूंसह अनेक जण आता आॅनलाईन खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे नक्षीकाम असलेले माठ आता आॅनलाईन मिळू लागले आहेत. परिणामी कुंभारबांधवांना याचा फटका बसत आहे.
लाकूड, मातीचे दर वाढले-
सद्य:स्थितीत १५०० रुपये मातीचे एक ट्रॅक्टर, चारशे रुपये एका छोटा टेम्पोभर माती असे कच्च्या मालाचे दर आहेत. तयार केलेले माठ शेकण्यासाठी लागणारे लाकूड ७ ते ८ रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. माठ बनविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्याला ठरावीक वेळ द्यावाच लागतो. त्यासाठी मेहनतही तशीच घ्यावी लागते.
माठ बनविणे परवडत नाही-
मेहनत व खर्च पाहता माठ बनविणे परवडण्यासारखे नाही. यामुळेच माठांचे भाव दुपटीने वाढलेले आहेत. भोसरीमध्ये राजन कुंभार, श्रीहरी कुंभार, बाळा कुंभार, जयप्रकाश नाथ या व्यावसायिकांनी विक्रीसाठी माठ ठेवलेले आहेत. साधारणत: पौष महिन्यात (डिसेंबर, जानेवारी) या महिन्यात बनविलेल्या माठांमध्ये उन्हाळ्यात अत्यंत गार पाणी असते, असे व्यावसायिक सांगतात.
व्यवसाय करणे अवघड-
३माठ खरेदी करताना ग्राहक काहीही भाव करतात. सांगितलेल्या दरापेक्षा निम्मे दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. मात्र, पर्याय नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हा पारंपरिक उद्योग आम्हाला करावाच लागत आहे. त्यातच आज-काल गरिबांच्या घरातही ‘इलेक्ट्रॉनिक फ्रिज’ आढळून येतो. त्यामुळे साहजिकच आमच्या व्यवसायावर परिणाम होतो, अशी खंतही कुंभार बांधवांनी व्यक्त केली.