आठशे रुपयांसाठी मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:03 AM2018-08-19T02:03:02+5:302018-08-19T02:03:22+5:30
पोलिसांकडून आरोपी मित्र जेरबंद
वाकड : हातउसने घेतलेले आठशे रुपये आणि मेमरी कार्ड परत न दिल्याच्या रागातून मित्राचा खून करणाऱ्या आरोपीचा वाकड पोलिसांनी शोध घेतला असून, गुन्हा घडल्यानंतर एका महिन्याने अनिल श्रावण मोरे (वय ३९, रा. सायली पार्क रहाटणी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. खुनातील आरोपीचा शोध घेण्यात वाकड पोलिसांना यश आल्याची माहिती वाकड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
कंपनीच्या कामगारांची ने-आण करणाºया बसचालक पवन ऊर्फ अनिल रमेश सुतार-हिरे (वय ३९, रा़ चिंबळी, खेड) याचा रहाटणी येथे महिन्यापूर्वी खून झाला. अज्ञात आरोपीविरुद्ध वाकड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र खून प्रकरणातील आरोपीचा शोध लागला नव्हता. वाकड तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हरीष माने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करत असताना सुतार काम करणारा अनिल मोरे हा पवनचा मित्र असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. दोघेही व्यसनी होते. खुनाच्या घटनेनंतर मोरे गायब झाला होता. त्याचा मोबाइल बंद असल्याने संपर्क होत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याबद्दल अधिक माहिती मिळविणे सुरू केले. आरोपी बावधन येथील पीबीपी आयटी शाळेत
सुतार काम करीत असल्याचे समजले. तेथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीला पकडण्याची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक हरीष माने, कर्मचारी दादा पवार, धनराज किरणाळे, सुरेश भोसले, श्याम बाबा, बिभीषण कण्हेरकर, हनुमंत राजगे, मनोज बनसोड, अशोक दूधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, दत्तात्रय इंगळे, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, महुम्मदगौस नदाफ, राजेंद्र बारशिंगे, भैरोबा यादव, गणेश गीरिगोसावी, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बाबू गायकवाड, राजू जाधव, सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.