घरफोडी, वाहनचोरीसाठी सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलांना फूस लावल्याचा प्रकार समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 09:04 PM2021-09-04T21:04:25+5:302021-09-04T21:06:57+5:30
चार दुचाकींसह दोन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी : घरफोडी व वाहनचोरीसाठी सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलांना फूस लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार दुचाकी, दोन कॅमेरे, रोकड, एक टीव्ही, असा एकूण दोन लाख ७२ हजार ३५५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. भोसरी पोलिसांनी ही कामगिरी केली.
किरण गुरुनाथ राठोड, असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड हा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसह भोसरी, एमआयडीसी भोसरी, निगडी परिसरात घरफोडी, वाहनचोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्या अनुषंगाने भोसरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करीत होते. दरम्यान भोसरी पोलिसांचे गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर आरोपी राठोड व दोन अल्पवयीन मुले संशयास्पदरित्या वावरताना दिसून आले. त्यावेळी राठोड हा त्याच्या दुचाकीवरून पळून गेला. तर दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन कॅमेरे मिळून आले. तर दुचाकी चाकण येथून चोरल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी राठोड याच्यासह भोसरी परिसरातील तीन ठिकाणी घरफोडी, निगडी व भोसरी एमआयडीसी परिसरात एका ठिकाणी चोरी केली. भोसरी व चाकण परिसरातून त्यांनी चार दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. त्याबाबत गुन्हे दाखल आहेत.
अल्पवयीन मुलांना पकडल्यानंतर जास्तवेळ पोलिसांना ताब्यात ठेवता येत नाही, अशी माहिती असल्याने आरोपी राठोड याने संबंधित अल्पवयीन मुलांना चोरी करण्यासाठी फूस लावली. संबंधित अल्पवयीन मुलांची कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर आरोपी राठोड याच्यावर एकूण २८ गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र भवारी, पोलीस कर्मचारी राकेश बोयणे, अजय डगळे, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, संतोष महाडिक, सागर जाधव, आशिष गोपी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.