पिंपरीत खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर अटकेत; तब्बल १३ वर्षे दिला होता पोलिसांना गुंगारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 05:23 PM2021-07-21T17:23:20+5:302021-07-21T17:24:10+5:30
अटक टाळण्यासाठी बनावट आधारकार्ड, लायसन्सचा वापर करत होता.
पिंपरी : खुनाच्या गुन्हयात फरार आरोपीला पकडण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. तब्बल १३ वर्षे गुंगारा देणाऱ्या या आरोपीने अटक टाळण्यासाठी बनावट आधारकार्ड, सातारा आरटीओचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि बँक ऑफ बडोदाचे डेबिट कार्ड बनवले. त्याद्वारे पोलीस व शासनाची फसवणूक केली. हा प्रकार २५ ऑगस्ट २००८ ते १६ जुलै २०२१ या कालावधीत घडला.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हजरतआली इसाक पठाण (वय ४९) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हनुमंत ऊर्फ पिंट्या महादेव चव्हाण (वय ३८, रा. विद्यानगर, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हा खुनाच्या गुन्ह्यासह इतर काही गुन्ह्यांमध्ये फरार आहे. न्यायालयानेही त्याला फरार घोषित केले आहे. मात्र, या गुन्ह्यात अटक टाळता यावी यासाठी त्याने अमित महादेव पाटील या नावाने बनावट आधारकार्ड, सातारा आरटीओचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि बँक ऑफ बडोदाचे डेबिड कार्ड बनवले. वेळोवेळी त्याचा कागदपत्रांचा वापर करून पोलिसांसह शासनाची फसवणूक केली. दरम्यान, गुंडा विरोधी पथकाने खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली असता त्याच्याकडे ही बनावट कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर त्याची चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.