रावण टोळीतील फरार आरोपींना कराडमधून सिनेस्टाईल पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 06:55 PM2021-10-11T18:55:50+5:302021-10-11T18:59:31+5:30

आरोपी हे कराड तालुक्यातील घारेवाडी गावच्या जवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि कराड पोलिसांनी मिळून आरोपींना सापळा लावला

fugitive accused ravana gang was caught cinestyle karad | रावण टोळीतील फरार आरोपींना कराडमधून सिनेस्टाईल पकडले

रावण टोळीतील फरार आरोपींना कराडमधून सिनेस्टाईल पकडले

googlenewsNext

पिंपरी: शहरातील कुविख्यात रावण टोळीच्या सदस्यांना कराड येथून सिनेस्टाईल पकडण्यात आले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कराड पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीला देखील गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या.

सुरज चंद्रदत्त खपाले (वय २२), हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (वय २१), सचिन नितीन गायकवाड (वय २१), अक्षय गोपीनाथ चव्हाण (वय २४, सर्व रा. चिखली), अशी अटक केलेल्या रावण टोळीतील अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात अनिरुद्ध उर्फ बाळा उर्फ विकी राजू जाधव (वय २४, रा. जाधववस्ती, रावेत) फरार होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळीतील अटक केलेल्या सदस्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात दाखल आहे. पिंपरी -चिंचवड पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची देखील कारवाई केली आहे. हे आरोपी फरार होते. गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी दहा दिवस गोवा, महाबळेश्वर, कराड येथे वास्तव्य करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला.

आरोपी हे कराड तालुक्यातील घारेवाडी गावच्या जवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि कराड पोलिसांनी मिळून आरोपींना सापळा लावला. त्यावेळी आरोपी राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांचे पथक दबा धरून होते. त्यावेळी आराेपी हे उसाच्या शेतात पळून जाण्याच्या तयारीत असताना अर्धा तास झटापट करून त्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले. रावण टोळीचा आणखी एक सक्रिय सदस्य अनिरुद्ध जाधव याला देखील शिताफीने पकडले. अनिकेत हा चोपडा पोलीस ठाणे जळगाव, उत्तमनगर पोलीस ठाणे पुणे शहर आणि वाकड पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यात फरार होता.     

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गंगाराम चव्हाण, विजय तेलेवार, गणेश मेदगे, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक फौजदार राजेंद्र शेटे, पोलीस हवालदार नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

आरोपींना पोलीस कोठडी
आरोपी सुरज, हृतिक, सचिन आणि अक्षय या आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना बुधवारपर्यंत (दि. १३) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अनिकेत याला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अनिकेत याच्याकडून पोलीसांनी दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त केली. तसेच आरोपी अनिकेत याला मंगळवारपर्यंत (दि. १२) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कामगिरीबद्दल गुंडा विरोधी पथकाला ५० हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

Web Title: fugitive accused ravana gang was caught cinestyle karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.