प्राणिसंग्रहालयास पूर्णवेळ शास्त्रज्ञ
By admin | Published: May 30, 2017 02:31 AM2017-05-30T02:31:26+5:302017-05-30T02:31:26+5:30
संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये पूर्णवेळ पशुवैद्यक आणि प्राणिशास्त्रज्ञ तथा शैक्षणिक अधिकारी (बायोलॉजिस्ट) नियुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये पूर्णवेळ पशुवैद्यक आणि प्राणिशास्त्रज्ञ तथा शैक्षणिक अधिकारी (बायोलॉजिस्ट) नियुक्त करण्यात येणार आहेत. मुलाखत पद्धतीने ही पदे भरण्यात येणार असून त्यांना एकत्रित मानधन देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे.
संभाजीनगर, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणातर्फे (सीझेडए) या प्राणिसंग्रहालयामध्ये पशुवैद्यक आणि प्राणिशास्त्रज्ञ ही दोन्ही पदे पूर्णवेळ नियुक्त असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे सीझेडएने नोंदविलेल्या काही आक्षेपार्ह गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच या प्राणिसंग्रहालयाला २०१८ पर्यंत मान्यता मिळणार आहे. प्राणिसंग्रहालय सुरू ठेवणे किंवा चालविणे यासाठी सीझेडएची मान्यता मिळविणे महापालिकेला बंधनकारक आहे, तसेच सीझेडएच्या नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. सीझेडएने भरती करण्यासाठी नमूद केलेल्या पदांचा समावेश महापालिकेतर्फे शासनाकडे सादर केलेल्या आकृतिबंधात केला आहे. त्यामध्ये पशुवैद्यक आणि प्राणिशास्त्रज्ञ या पदांचाही समावेश आहे. मात्र, आकृतिबंधास मान्यता मिळेपर्यंत ही पदे मानधन तत्त्वावर भरण्याचा निर्णय महापालिका पशुवैद्यकीय विभागाने घेतला आहे. अनुक्रमे ही दोन पदे भरण्यात येणार असून पशुवैद्यक पदासाठी पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता ठेवली आहे. तसेच वन्यजीव शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा वन्यजीव विषयासह मास्टर डिग्री असणे गरजेचे आहे.
निकष जाहीर : संबंधित विषयात पदव्युत्तर
प्राणिशास्त्रज्ञ या पदासाठी जीवशास्त्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ही किमान शैक्षणिक पात्रात आहे. त्यामध्ये प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वन्यजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आदींपैकी किमान एक विषय असला पाहिजे. त्याचप्रमाणे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील लेखन आणि वाककौशल्य आवश्यक, तसेच वन्यजीव विषयक शैक्षणिक, जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचा अनुभव या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
मुलाखतपद्धतीने भरती
पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडे प्राणिसंग्रहालयातील कामकाजाचा, वन्यजीव हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात येणार असून, मुलाखत पद्धतीने ही पदे भरण्यात येणार असून पशुवैद्यकाला पंचेचाळीस हजार रुपये, तर प्राणिशास्त्रज्ञास तीस हजार रुपये दरमहा मानधन देण्यात येणार आहे.