अंत्यविधीसाठी जावे लागते १३ किलोमीटर, कब्रस्तानची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 12:04 AM2018-12-19T00:04:40+5:302018-12-19T00:04:59+5:30
बोहरी समाज : कब्रस्तानची मागणी
खडकी : येथील कॉस्मोपोलिटियन समजल्या जाणाऱ्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बोहरी समाजाला अंत्यविधीसाठी खडकी ते घोरपडे पेठ (पुणे) असा १३ किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
बोहरी समाजातर्फे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे याबाबत अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. बोर्डाच्या अधिकाºयांच्या भेटीगाठीही सातत्याने घेण्यात आल्या आहेत. अधिकाºयांना आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. मात्र खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने समाजाच्या मागणीला केराची टोपली दाखवत समाजाला कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. ब्रिटिशकाळापसून खडकी बाजारात बोहरी समाज वास्तव्यास आहे. आठ ते दहा पिढ्यांपासून हा समाज खडकीत राहत आहे. समाजाची बोहरी मशीदही खडकीत आहे. मात्र अंत्यविधीसाठी खडकीत समाजाचे कब्रस्तान नाही. त्यामुळे समाजबांधवांना पुण्यातील घोरपडे पेठ येथे अंत्यसंस्कार करावे लागतात. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. आमदार विजय काळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही मागणीचे निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही, अशी माहिती रियाज घडियाली यांनी दिली.