भडकाऊ भाषणाचा परिणाम नाही - गफ्फार मलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:39 AM2018-10-06T01:39:04+5:302018-10-06T01:39:25+5:30
गफ्फार मलिक : भारिप बहुजन महासंघ व एमआयएमवर टीका
तळेगाव दाभाडे : भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या नेत्यांचे मुस्लिम आणि दलितांसाठी कोणतेही योगदान नाही. समाजाच्या विकासाचा आराखडाही नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी जोडलेल्या या दोन्ही समाजातील लोकांवर या नेत्यांच्या केवळ भडकाऊ भाषणाने कोणताही परिणाम होणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ. गफ्फार मलिक यांनी व्यक्त केले.
मावळ तालुका विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्याक सेलच्या मेळाव्यासाठी ते प्रमुख अतिथी म्हणून तळेगाव दाभाडे येथे आले होते. मेळाव्यानंतर पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याची शक्यता वर्तवली. गफ्फार मलिक म्हणाले ‘‘देशातील आणि राज्यातील सेक्युलर विचारसरणीचे लोकांनी भाजपा आणि शिवसेनेच्या उपद्रवी मूल्यांना ओळखले असून, पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातून या वेळी शरद पवार यांच्या पाठीशी तमाम मतदार भक्कमपणे साथ देतील.’’ अल्पसंख्याक समाजातील प्रज्ञावंतांना व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्र्फे लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई किंवा पुण्यात त्यांचा पहिला मेळावा होईल. जातीय सलोखा राखण्यासाठी विशेषत: निवडणुकीच्या काळातील अल्पसंख्याकांची सुरक्षितता यावर चर्चा होईल.
गफ्फार म्हणाले, ‘‘अल्पसंख्याकावर देशभरात होणारे अत्याचार खेदजनक आहेत. समाजात फूट पाडणे आणि पैसा वाटणे यांच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप मलिक यांनी या वेळी केला. राष्ट्रवादी पक्षाने त्याची दखल घेत अल्पसंख्याकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. समाजात फूट पाडणाऱ्या घटनांपासून सावध राहण्याचा आणि शक्यतो कटू प्रसंग टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. समाजविघातकांना संधी देऊ नका आणि वेळ पडलीच तर पोलीस व जिल्हाधिकारी प्रशासनास तत्परतेने कळवण्याचे आवाहनही त्यांनी केले.