गजबजतोय देहूगावचा मजूर अड्डा, ठेकेदार, कामगारांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:05 AM2017-12-11T03:05:57+5:302017-12-11T03:06:08+5:30
येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव : येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे. काही प्रमाणात पैशांची बचतही होत आहे.
देहूगाव हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी सध्या पिंपरी-चिंचवडच्या जवळ असल्याने सर्र्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने वेगाने विस्तारत आहे. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षणाच्या बहुतेक सर्वच सोयी अवघ्या काही किलोमीटर अंतरावर उपलब्ध होत आहेत. शासनाकडून गावात अनेक विकासकामे झाली आहेत. दळणवळणाच्याही सोयी उपलब्ध असल्याने शहरात महागडी सदनिका खरेदी करण्यापेक्षा येथे स्वत:ची जागा घेऊन टुमदार घर बांधण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. येथे अनेक गृहसंकुलांचे काम सुरू असून शहरापेक्षा खूप किमतीत सदनिका उपलब्ध होत आहेत. त्यामुळे येथील जागेला चांगली मागणी वाढली असून, तेथे बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीमुळे विकसनशील देहूगावात मध्यमवर्गीय व कामगार क्षेत्रातील कामगार येथे घरास प्राधान्य देऊ लागले आहेत.
बांधकाम क्षेत्रासाठी कामासाठी स्थानिक कामगार कमी पडत असल्याने आणि येथे रोजगार चांगला उपलब्ध होत असल्याने येथे राज्यातील औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांसह देशातील मध्य प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमधील बांधकाम क्षेत्रातील गवंडी कारागीर व त्यांच्या हाताखाली काम करणारे सुमारे ३०० ते ४०० मजूर येथे रोज सकाळी आठ ते दुपारी बारा दरम्यान आपले टिकाव, फावडी, घमेली यांच्यासह थापी, रंधा असे साहित्य घेऊन येथील प्रवेशद्वार कमानीजवळ येऊन उभे राहतात. ठेकेदार आपणास आवश्यक त्या लोकांची निवड करून रोजगार ठरवून घेऊन वाहनातून घेऊन जातात. जर काम मिळाले तर कामावर जायचे, नाहीतर घरी जायचे असा येथील या कामगारांचा शिरस्ता झाला आहे. सध्या देहूगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे कामगारांना चांगलीच मागणी असल्याने येथे दिवसेंदिवस कामगारांची गर्दीदेखील चांगलीच वाढत आहे. त्यामुळे सकाळी दहाच्या सुमारास ठेकेदार व कारागीर आणि मजुरांच्या रोजगारासाठी संबंधितांशी बोली होताना पहायला मिळते. यामुळे वाहनांची चांगलीच गर्दी होते. या गर्दीमुळे चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथून आळंदी आणि देहूरोडकडे रस्ते जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा थांबविण्यासाठी हे कामगार रस्त्याच्या कडेला कमानीखाली मोकळ्या जागेत थांबतात. मात्र, वाहनचालक हे गर्दी पाहून वेग कमी करतात व वहातुकीची गती मंदावते परिणामी वहातुकीचा खोळंबा होत जात आहे.
कामाची आशा : काही जणांकडून फसवणूक
येथील मजूर अड्ड्यावरील कामगार सुभाष लष्करे म्हणाले की, येथे देशाच्या आणि राज्याच्या विविध भागांतून कामगार आलेले असून, सकाळी आठ वाजल्यापासून काम मिळेल या आशेवर उभा राहतो, काम मिळाले तर कामावर जायचे नाहीतर घरी जायचे. गवंड्यासाठी ५०० ते ६०० रुपये रोज व बिगारी पुरुषासाठी ४०० रुपये, महिला बिगारीसाठी २०० ते ३०० रुपये रोज मिळतो. काम झाल्यावर लगेच पैसे घेतले जातात.मात्र, काम जास्त असेल तर कामाच्या प्रमाणात विश्वासावर दोन तीन दिवस कामगार थांबतात. काही लोक काम संपत आले की सुटी होण्याच्या वेळी पैसे देण्यास टाळा टाळ करतात व भ्रमणध्वनी बंद ठेवतात. रोज नाही मिळाला तर बहुतांशी मजुराच्या घरची चूल पेटणे अवघड होते. काही लोक काम करून घेतात व पैसे बुडवितात. हाही अनुभव आल्याचे लष्करे यांनी सांगितले.