शहरात गुंठामंत्र्यांच्या उधळपट्टीसाठी ‘क्लब’च्या नावाखाली चालतोय जुगार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 01:52 PM2020-01-18T13:52:47+5:302020-01-18T14:01:01+5:30
आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पैसा हातात खेळू लागल्याने गुंठामंत्र्यांच्या हौसेसाठी आणि उधळपट्टीसाठी क्लब हाऊस सुरू झाले
पिंपरी : शहराच्या औद्योगिक विकासामुळे पिंपरी-चिंचवड येथील शेतजमिनींना सोन्याचा भाव आला. एकराचे गुंठे पाडून विकल्याने अनेकजण गुंठामंत्री झाले. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पैसा हातात खेळू लागल्याने गुंठामंत्र्यांच्या हौसेसाठी आणि उधळपट्टीसाठी क्लब हाऊस सुरू झाले. पिंपरी-चिंचवड शहरात समाविष्ट झालेल्या च-होली, देहूफाटा, वाकड, हिंजवडी, रावेत या भागात क्लबच्या नावाखाली अवैध जुगार राजरोसपणे सुरू आहेत. आता गुन्हेगारांसाठी जुगाराची ठिकाणे आश्रयस्थाने बनू लागली आहेत.
पिंपरी-चिंचवडचा विकास गाव ते महानगर असा झपाट्याने झाला. औद्योगिक विकासाबरोबर नोकरी व व्यावसायासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. निवासासाठी व घरांसाठी जागांची मागणी
वाढली. ज्यांच्या वडलोपार्जित जमिनी आहेत. त्या जमिनींना सोन्याचे भाव आल्याने एकराचे गुंठे पाडून जमिनीची विक्री सुरू झाली. त्यातून शहरात अनेक गुंठामंत्री तयार झाले. काही गुंठ्यामंत्र्यांनी राजकारणात भाग घेतला. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी अवैध धंद्यांना राजाश्रय दिला आहे.
आपली अडगळीची जागा अवैध धंद्यांना भाड्याने देणे. एखाद्या हॉटेल व्यावसायिकांशी करार करून त्याच्यासोबत क्लब सुरू करण्यात आले. शहरालगत वाकड, हिंजवडी, काळेवाडी फाटा, देहूफाटा, आळंदी फाटा, च-होली फाटा अशा ठिकाणी क्लबच्या नावाखाली राजरोसपणे जुगार व्यावसाय सुरू आहेत. शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यास हे अवैध उद्योगधंदे बंद होतील, अशी सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना अपेक्षा होती. मात्र, आयुक्तालय झाल्यानंतरही कमी होण्याऐवजी हप्तेगिरीमुळे उद्योगनगरी अवैध धंद्यांचे आगार होऊ लागली आहे.
.....
वाकड रस्त्यावर डांगेचौकाजवळ ‘एसके’
* भोसरी एमआयडीसी गोठ्याजवळ एक
* आकुर्डी थरमॅक्स चौकापासून जवळ एक
* आकुर्डी विद्यानगर भागात दोन
* गांधीनगर खराळवाडी येथे एक
* काळेवाडी परिसरात दोन
* वाकड गावठाण येथे एक क्लब
* रावेत येथे एक जुगार क्लब
* दापोडी येथील झोपडपट्टी परिसरात
* भोसरी गवळी माथा येथे एक क्लब
* चºहोली फाटा येथे मुक्ताई लॉन्ससमोर
* देहू फाटा येथे श्री मोटर्समागे जुगार
* आळंदी देहू रस्त्यावर दोन क्लब
* बालाजीनगर, शांतीनगर व लांडेवाडी प्रत्येकी एक
...............
जुगार बंद केल्याचा फार्स
१पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व जुगार क्लब बंद केल्याचा फार्स पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, मटका व जुगार व्यावसायिक या धंद्यासाठी एकाच भागात तीन जागांची निवड करतो. कोणाची तक्रार आल्यास एका जागेवरील जुगाराचा टेबल त्याच भागातील दुस-या ठिकाणी हलविण्यात येतो. तसेच पहिल्या ठिकाणी दोन फंटर उभे केले जातात. ते फंटर दुस-या ठिकाणी सुरू झाल्याचा पत्ता देतात. अशा प्रकारे जुगार बंद केल्याचा केवळ फार्स केला जातो.
.............
‘एसके’च्या सांकेतिक नावाला डिमांड
पुणे हद्दीत प्रसिद्ध असलेला ‘एसके’ जुगार क्लब बंद झाला आहे. आता ‘एसके’ला वाकड रस्त्यावरील डांगे चौकाजवळ राजाश्रय मिळाला आहे. केवळ ‘एसके’ या सांकेतिक नावाखाली हा जुगार क्लब जोरात सुरू आहे. याठिकाणी पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील काही गुन्हेगारही या क्लबमध्ये जुगार खेळण्यासाठी येत आहेत. शहरातील मोठा क्लब असून, त्यानंतर दुसरा मोठा क्लब एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोठ्याजवळ सुरू आहे. हे दोन्ही क्लब गुन्हेगारांचा अड्डा बनले आहेत.
............