पुण्यात बंद झालेला जुगार-मटका पिंपरी-चिंचवडमध्ये राजरोसपणे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 05:32 PM2020-01-14T17:32:51+5:302020-01-14T17:34:32+5:30
पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष : हप्तेगिरीने वाढली उद्योगनगरीतील गुन्हेगारी...
पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कडक निर्बंध आणल्याने सर्व अवैध जुगार व मटका व्यवसाय पिंपरी-चिंचवड शहरात स्थलांतरित झाले आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, आळंदी, चाकण, देहूरोड व निगडी या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे या अवैध धंद्यांना राजकीय व गुन्हेगारांचा राजाश्रय असल्याचे माहिती असूनही हप्तेगिरीमुळे पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास औद्योगिक क्षेत्रामुळे झपाट्याने झाला. नोकरी व व्यावसायासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह परराज्यांतील तरुण रोजगारासाठी येथे स्थायिक झाला आहे. त्याचबरोबर रोज बेरोजगारांचा लोंढा शहरात येत आहे. येथील कामगारांकडे पैसा असल्याने येथे अनेक अवैध उद्योगधंद्यांना चांगली चलती आहे. त्यामुळेराज्यात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक गुन्हेगारीचे प्रमाण आहे.
* निगडी उड्डाणपुलाच्या परिसरात लॉटरीची दुकाने असून, यापैकी काही दुकानात लॉटरीच्या नावाखाली मटका सुरू आहे. परिसरातील नागरिकांच्या तक्रारी असूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे. शहरातील विविध भागात ३६ लॉटरीच्या दुकानात लॉटरीचे फलक लावून आतमध्ये मटका व जुगाराचे अवैध धंदे सुरू आहेत. या दुकानांमध्ये सोरेट, काळे पांढरे, चिंमणी पाखरे असे जुगार टेबल सुरू आहेत.
* गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना दीड वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट २०१८ ला करण्यात आली. त्यानंतरही गुन्हेगारीचे प्रमाण पुरेसे कमी झालेले नाही. उलट महिला अत्याचार, विनयभंग, वाहनचोरी व दरोडे वाढले आहेत. या सर्व गुन्हेगारी वाढण्याचे मूळ शहरातील जुगार, मटका व अवैध व्यवसाय हे आहे. मात्र, पोलीस आयुक्तालयानंतरही अवैध उद्योग थांबलेले नाहीत.
......................
* कामगारांचे झाले संसार उद्ध्वस्त
उद्योगनगरीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध धंदे पुणे शहराप्रमाणे १०० टक्के बंद होण्याची आवश्यकता आहे. उलट, पुणे शहरातून हद्दपार केलेले जुगार व मटका पिंपरी-चिंचवड शहरात मात्र राजरोस सुरू आहेत. या अवैध धंद्यांचे व्यसन लागल्याने शहरातील अनेक कामगारांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
........
* मटका-जुगार सुरू असलेली ठिकाणे
वाल्हेकरवाडी येथील राजवाडा हॉटेलपासून काही अंतरावर
चिंचवड रेल्वे स्टेशन मालधक्का येथील पुलाखाली
लिंकरोड येथील रमाबाईनगर परिसरात मटका सुरू
काळेवाडी पाचपीर चौक परिसरात मटका सुरू
रहाटणी येथे विमल गार्डन समोरील नदीच्या बाजूला
थेरगाव येथील वेंगसरकर अॅकॅडमीच्या परिसरात
निगडी गावठाण व ओटा स्किम येथे मटका सुरू
चिंचवड अजंठानगर व चिखली रोड
सांगवी व कासारवाडी रेल्वे स्टेशनशेजारी
पिंपळे-निलख येथील नदीच्या बाजूला
भोसरी येथील कबरस्थान शेजारील शाळेमागे
भोसरी पीएमपी बस थांब्याजवळ जगदंबा हॉटेलमागे
मोशी येथे एक व देहूफाटा येथील एका जीम मागे
आळंदी-मरकळ रोड व देहूरोड
...........