'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप
By विश्वास मोरे | Published: September 28, 2023 04:24 PM2023-09-28T16:24:22+5:302023-09-28T16:24:48+5:30
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेश भक्तांनी भर दिला तसेच नदी मूर्ती विसर्जन करण्याचे टाळले. पावणेचारपर्यंत उघडीप दिलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे...
पिंपरी : गेले दहा दिवस विराजमान असणाऱ्या गणरायाला पिंपरी- चिंचवड शहरातील गणेशभक्तांनी गुरुवारी निरोप दिला.'' बाप्पा मोरया रे, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत अपूर्व उत्साहात भक्तांनी गणरायाला निरोप दिला. सकाळी आणि दुपारच्या टप्प्यामध्ये घरघरात स्थापन केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेश भक्तांनी भर दिला तसेच नदी मूर्ती विसर्जन करण्याचे टाळले. पावणेचारपर्यंत उघडीप दिलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे.
पिंपरी -चिंचवड शहरामध्ये गेल्या दहा दिवसांपासून विराजमान असणाऱ्या गणरायाला निरोप देण्याची वेळ समीप आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील २६ विसर्जन घाटावर गणेश भक्त मूर्ती विसर्जनासाठी येत होते. सकाळच्या टप्प्यामध्ये घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात येत होते. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणुकीची तयारी सुरू झाली होती. पावसाची उघडीप अससल्याने मंडळाचे कार्यकर्ते सकाळपासूनच मिरवणुकीची तयारी करताना दिसून आले.
चिंचवडमधील सोहळ्याची तयारी!
पिंपरी -चिंचवड औद्योगिक नगरीतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील चिंचवड मधील मिरवणूक पाहण्याजोगी असते. चिंचवड गावातील चापेकर चौकातून वाल्हेकर वाडी रस्त्याने थेरगाव पवना नदी घाटावर गणरायाचे विसर्जन करण्यात येते. महापालिकेच्या वतीने चापेकर चौकामध्ये स्वागत कक्ष उभारलेला आहे. तसेच पुढे विसर्जन मार्गापर्यंत बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे. मार्गावर गणेश भक्तांना नमो चहा वाटप करण्यात येत आहे. तसेच काँग्रेसच्या वतीने ही स्वागत कक्ष उभारलेला आहे.
नदीत मूर्ती विसर्जन करण्याचे टाळले!
पिंपरी चिंचवड शहरातील २६ विसर्जन घाटांवर गणेश विसर्जन करण्यात आले. शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी अशा तीन नद्या वाहतात या तीनही नद्यांच्या घाटांवर महापालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे फलक लावण्यात आलेले आहेत तसेच नदीपात्राला बॅरीकेटींग करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी गणेश विसर्जन मिरवणुक सोहळ्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा आढावा घेतला. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, कृत्रिम हौद उभारण्यात आल्याने त्यामध्ये गणेश भक्त गणरायाचे विसर्जन करत असल्याचे दिसून आले.
सीसीटीव्हीची नजर!
चिंचवड गावातील चापेकर चौक तसेच विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे. तसेच गणेश विसर्जन घाटावर सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. सोहळ्यावर सीसीटीव्हीची नजर असल्याचे दिसून आले. मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तसेच महापालिकेचे आरोग्य, वैद्यकीय, अग्निशामक दलाचे पथक, विसर्जन घाटावर सेवा देत असल्याचे दिसून आले.
हलक्याशा पावसाच्या सरी!
सायंकाळी पावणे चारपर्यंत पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे सकाळच्या टप्प्यामध्ये घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी पावणे चार नंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली. गणेश भक्तांचा उत्साह पुन्हा वाढला. दुपारी चार पर्यंत चिंचवडच्या मिरवणुकीस सुरुवात झालेली नव्हती.