Ganesh Visarjan: गणपती बाप्पा मोरया! पिंपरीत दीड दिवसांच्या गणपतीला निरोप
By विश्वास मोरे | Published: September 8, 2024 07:29 PM2024-09-08T19:29:43+5:302024-09-08T19:30:24+5:30
शहरात ८५ ठिकाणी विसर्जनाची सोय महापालिकेच्या वतीने केली होती
पिंपरी: अधून- मधून उसंत घेऊन पडणाऱ्या सरी आणि 'गणपती बाप्पा मोरया...' म्हणत, घरगुती प्रतिष्ठापना केलेल्या दीड दिवसाच्या गणरायाला पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी निरोप दिला. शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी घाटावर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. नोकरदार वर्गाने बाप्पाना निरोप दिला.
उद्योगनगरीत शनिवारी गणरायाचे आगमन झाले. गणेशभक्तांत अपूर्व उत्साह शहरात जाणवत होता. दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते, तोच त्यांना निरोप देण्याची वेळ आली. त्यामुळे गणेशभक्तांना रुखरुख लागली. त्यामुळे आज सकाळपासूनच घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपतीला मोदक, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून विसर्जन केले.
नोकरदार वर्गाने दिला बाप्पाना निरोप
कामगारनगरी आहे. त्यामुळे नोकरदार वर्गामध्ये दीड दिवसासाठी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाणही अधिक आहे. रविवारी दुपारपासून पवना, मुळा आणि इंद्रायणी घाटावर विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याठिकाणी सायंकाळच्यावेळी विसर्जनासाठी भाविक येताना दिसत होते. तर अधून- मधून पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी गणपतीवर धरलेल्या छत्र्या सावरत, गणेशमूर्तींवर प्लास्टिकचे आच्छादन घालून गणेश तलाव, रावेत जाधव घाट, चिंचवड थेरगाव घाट, मोरया घाट, काळेवाडी घाट, पिंपरी घाट यांच्यासह एकूण ८५ ठिकाणी विसर्जनाची सोय महापालिकेच्या वतीने केली होती. त्याठिकाणी वैद्यकीय आणि आरोग्यविषयक पथक, नदी प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम हौदही तयार केले आहेत. तसेच नदी घाटावर अग्निशामक दलाचे आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. विसर्जनस्थळी बाप्पाला निरोप देताना भाविकांना गलबलून आले होते. ऋषिपंचमी निमित्त चिंचवड गावातील पवना, मुळा आणि इंद्रायणी तीरी महिलांनी पूजाही केली. चिंचवड मोरया गोसावी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.