गणेश हरगुडे ठरला पहिला ‘देहूरोड केसरी’
By admin | Published: March 20, 2017 04:28 AM2017-03-20T04:28:09+5:302017-03-20T04:28:09+5:30
येथील शिवस्मारक समिती, शिवजयंती महोत्सव समिती व श्री छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान ( देहूरोड पंचक्रोशी ) यांच्या विद्यमाने
देहूरोड : येथील शिवस्मारक समिती, शिवजयंती महोत्सव समिती व श्री छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान ( देहूरोड पंचक्रोशी ) यांच्या विद्यमाने शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली. चमकदार लढतींनी आखाड्यास चांगलीच रंगत आणली. पहिल्या देहूरोड केसरीचा मान पुण्यातील गणेश हरगुडे याने मिळविला.
येथील किवळे -रावेत विकास सोसायटीच्या पटांगणात लाल माती टाकून बनविलेल्या स्व. शांताराम माळी आखाड्यात लढती झाल्या. मल्लांच्या लढती संयोजकांनी निश्चित केलेल्या असल्याने नावे जाहीर केल्यांनतर त्वरित कुस्ती सुरु करण्यात येत होती. कुस्ती आखाड्याचे पूजन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तरस, बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅड कृष्णा दाभोळे, कामगार नेते लहू शेलार, दत्तात्रय राऊत, मनसेचे अध्यक्ष विनोद भंडारी, महाराष्ट्र चॅम्पियन तानाजी काळोखे , रमेश राक्षे , गुलाब जाधव आदींच्या यांचे हस्ते करण्यात आले.
अखेरची कुस्ती गुरुकुल कुस्ती संकुल (सोमाटणे) येथील पैलवान सोन्या सोनटक्के व मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, पुणे येथील पैलवान गणेश हिरगुडे यांच्यात झाली. ही कुस्ती खूपच चमकदार झाली या कुस्तीत हिरगुडेने सोनटक्केला चितपट करीत देहूरोड केसरीची मानाची गदा पटकाविली. पंच म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू शंकर कंधारे, मोहन खोपडे, संजय दाभाडे, अमित पिंगळे, खंडू वाळुंज यांनी काम पाहिले. बोर्ड सदस्य खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, ललित बालघरे, अमोल नाईकनवरे, उद्योजक संजय माळी, रमेश जाधव, किशोर जगताप, सूर्यकांत सुर्वे आदी उपस्थित होते. विविध पक्षांचे पदाधिकारी व संयोजक संस्थांच्या सभासदांनी आखाडा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. बाळासाहेब झांजाड व
संजय पिंजण यांनी सूत्रसंचालन
केले. (वार्ताहर)