गणेश मंडळांनी नियम पाळावेत

By Admin | Published: August 20, 2015 02:28 AM2015-08-20T02:28:53+5:302015-08-20T02:28:53+5:30

ढोल, ताशे, तुतारीचा दणदणाट हवा. मंडप टाका, चांगले देखावे करा. मात्र, रुग्ण, आया- बहिणींना त्यांचा त्रास होणार नाही, याची थोडी काळजी घ्याच

Ganesh mandals should follow the rules | गणेश मंडळांनी नियम पाळावेत

गणेश मंडळांनी नियम पाळावेत

googlenewsNext

पिंपरी : ढोल, ताशे, तुतारीचा दणदणाट हवा. मंडप टाका, चांगले देखावे करा. मात्र, रुग्ण, आया- बहिणींना त्यांचा त्रास होणार नाही, याची थोडी काळजी घ्याच, अशी विनंती चरित्रअभिनेते मोहन जोशी यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात पार पडला. पारितोषिक वितरण जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पिंपरी-चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उद्योजक राजेशकुमार साकला, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, अमित गोरखे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आदी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘‘गणेशोत्सव सर्वच धर्माचे लोक साजरा करतात. मोठ्या आकाराच्या मंडपामुळे वाहतुकीस अडथळा होतो. मध्यरात्री कर्कश्श आवाजात मिरवणूक काढली जाते. याचा रुग्ण, वृद्ध, घरात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यानंतर सर्वत्र अस्वच्छता निर्माण होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी मंडळाची कोअर कमिटी तयार करा. मंडळावर काही बंधने हवीत. मर्यादित आवाजात मिरवणूक काढावी. कचरा होऊ देऊ नये. वाहतुकीस अडथळा होणार नाही, असे मंडप घाला. नागरिकांना त्यांचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या.’’
‘‘राज्यात गणेशोत्सवात वेगवेगळ्या बंधनांतून विघ्न येत आहेत. रात्री दहानंतर देखावे बंद, स्पीकरबंदी, रस्त्यावर मंडपास बंदी, असे नियम लादले जात आहेत. हे विघ्न बाजूला सारून, आहे त्या परिस्थितीत मोठ्या उत्साहात सण साजरा करा. गणेशभक्तांची ताकद दाखवून द्या,’’ असे आवाहन खासदार बारणे यांनी केले. ‘‘कार्यकर्त्यांच्या डाटाचा वापर करून ‘स्किल इंडिया’च्या धोरणानुसार कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यकर्त्यांना द्यावे. केंद्राच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्या माध्यमातून समाजात पोहोचवाव्यात. यातून मंडळांना दिशा लाभेल,’’ असे मत खासदार साबळे यांनी व्यक्त केले. ‘‘स्पर्धेतील बक्षिसांमुळे मंडळांना प्रोत्साहन मिळते. आपल्या मागे कोणी तरी आहे, याची भावना वाढीस लागली आहे. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही ट्रस्टने उपचारासाठी निधी द्यावा,’’ अशी मागणी आमदार चाबुकस्वार यांनी केली.
बक्षीस हे गणपतीचा महाप्रसाद आहे. त्यामुळे मंडळांची जबाबदारी वाढली असल्याचे मत भोईर यांनी व्यक्त केले. ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्रत्येक मंडळाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाचा दणदणाट करीत, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बक्षीस स्वीकारले. काही कार्यकर्ते एका गणवेशात, डोक्यावर केशरी रंगाची टोपी घालून आले होते. छायाचित्र घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाली होती. एकूण १४७ पैकी ७० मंडळांना एकूण ८ लाख ४९ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस भोसरीच्या लांंडगे लिंबाची तालीम मंडळाने पटकाविले. प्राधिकरणातील जयहिंद मंडळ, चिंचवड गावातील अखिल मंडई मंडळ, भोसरीतील आझाद मंडळ आणि चिखलीतील जय बजरंग मंडळाने अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळविला. तसेच, प्रत्येक प्रभागातील ५ मंडळे, जिवंत देखावा, रौप्य महोत्सवी मंडळ, विद्युत रोषणाई, हौसिंग सोसायटी, विशेष, उल्लेखनीय, उत्कृष्ट देखावे अशा गटात बक्षिसे प्रदान करण्यात आली.
(प्रतिनिधी)

Web Title: Ganesh mandals should follow the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.