देहूरोडला टोळक्याचा धुडगूस
By admin | Published: March 12, 2017 03:22 AM2017-03-12T03:22:16+5:302017-03-12T03:22:16+5:30
युवकास मारहाण केल्यानंतर त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्याचे समजल्यावरून संबंधित युवकाच्या घराचे दरवाजे, खिडक्या, तसेच परिसरातील वाहनांची
देहूरोड : युवकास मारहाण केल्यानंतर त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्याचे समजल्यावरून संबंधित युवकाच्या घराचे दरवाजे, खिडक्या, तसेच परिसरातील वाहनांची २० ते २२ जणांच्या टोळक्याने तोडफोड करीत परिसरात दहशत माजविली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही टोळक्याकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक होमगार्ड जखमी झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. टोळक्यातील इतर सर्वजण फरार झाले आहेत.
याबाबत सतवेल चिन्हास्वामी (वय ३०, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वीरा चिन्हास्वामी (वय २९, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) व पोलीस होमगार्ड पथकातील गणेश मारुती शिर्के अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुरेश प्रेमसिंग भिगानिया (वय ३४, रा. एम बी. कॅम्प, देहूरोड) व नागेश ऊर्फ आम्मु प्रकाश रेड्डी (वय २३, दोघे रा. पारशी चाळ, देहूरोड) या दोघांना अटक केली, तर तडीकरण स्वामी, शंकर सुब्रमनी, बालाजी मुदलियार, रवि मुदलियार, बाल कृपास्वामींचा मुलगा चुहा, (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), शिवा आरगुरम (सर्व रा. एम.बी. कॅम्प, देहूरोड ) यांच्यासह त्यांच्या १० ते १२ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंधळ सुरु असल्याचे समजताच देहूरोड पोलीस घटनास्थळी गेले. आरोपींनी पोलिसांवरही दगडफेक केली. यामध्ये होमगार्ड गणेश शिर्के यांना दगड लागला असून, ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक आहे.(वार्ताहर)
दहशत माजविण्याचा प्रयत्न
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश भिगानिया याने वीरा चिन्हास्वामी यांना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मारहाण केली होती. त्यामुळे चिन्हास्वामी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले होते. हे आरोपीस समजल्यावरून आरोपी सुरेशने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. फिर्यादी सतवेल चिन्हास्वामी व त्याच्या घराशेजारील (एमबी कॅम्प) परिसरातील घरांवर आरोपींनी दगडफेक करीत दहशत माजविली. तसेच उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोड नुकसान केले.