गुंडांनी शस्त्र बाळगले, पोलिसांनी घरातून उचलले; गणेशोत्सवात गुंडा विरोधी पथकाची विशेष मोहीम
By नारायण बडगुजर | Published: September 23, 2023 06:38 PM2023-09-23T18:38:54+5:302023-09-23T18:40:09+5:30
गुंडा विरोधी पथकाचा गुन्हेगारांनी घेतला धसका ...
पिंपरी : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात आहे. तसेच गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने गणेशोत्सवादरम्यान विशेष मोहीम राबवली. वाकड, देहूरोड आणि शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुंडांच्या मुसक्या आवळल्या. हे तीनही गुंड तडीपारीच्या कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत येऊन शस्त्र बाळगून होते. गुंडा विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांनी धसका घेतला आहे.
दीपक आबा दाखले (२५, रा. रहाटणी) याला ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले. तो परवानगीशिवाय शहरात आला. त्याच्याकडे शस्त्र आहे, अशी माहिती पोलिस अंमलदार रामदास मोहिते यांना मिळाली. त्यानुसार दाखले याला त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक सत्तूर मिळाला. याप्रकरणी त्याच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दीपक दाखले याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.
अमित गजानन वानरे (३२, रा. आदर्श नगर, किवळे, देहूरोड) याला १२ जुलै २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार केले. तो देखील शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबत गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार शुभम कदम यांना माहिती मिळाली. पोलिसांनी अमित वानरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केली. अमित वानरे याच्या विरोधात २०१५ पासून देहूरोड, खडकी, चिंचवड, तासगाव, चाकण, निगडी, पिंपरी, रावेत पोलिस ठाण्यात एकूण १२ गुन्ह्यांची नोंद आहे.
मावळ परिसरातील सराईत गुन्हेगार समीर उर्फ सोन्या जालिंदर बोडके (२८, रा. गहुंजे गाव, ता. मावळ) यालाही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले. तो देखील बेकायदेशीरपणे जिल्ह्याच्या हद्दीत आला. याबाबत गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार गणेश मेदगे यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत समीर बोडके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सत्तूर हे शस्त्र जप्त केले. समीर याच्या विरोधात २०१४ पासून तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.
गुंडा विरोधी पथकाचा गुन्हेगारांनी घेतला धसका
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हे शाखेला विविध कारवाया करण्याचे तसेच अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांच्या गुंडा विरोधी पथकाने विशेष मोहीम राबविली. यात सराईत गुन्हेगारांची धरपकड केली. गणेशोत्सवात ही मोहीम सुरूच राहणार आहे. सराईत गुन्हेगारांचा त्यांच्या घरी, परिसरात जाऊन शोध घेतला जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांनी व त्यांच्या पिलावळीने धसका घेतला आहे.